आर्यन खान, मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी, भ्रष्टाचार, जात प्रमाणपत्र, जन्माचा दाखला…अशा प्रकरणांवरुन झालेल्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र, आता या आरोपांना वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी तिने या आरोपांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

क्रांती रेडकरने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. सर्वांचा जन्मदाखला ऑनलाइन उपलब्ध असतो, पण समीर वानखेडेंचा जन्मदाखला सापडत नाहीये, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता. त्याबद्दल विचारणा झाली असता क्रांती रेडकर म्हणाली, “एवढं सगळं शोधलं तर त्यांनी हेही शोधायला हवं होतं की त्यांचं ऑनलाइन सर्टिफिकेट का नाही. माझ्या सासऱ्यांनी समीर यांचा जन्म दाखला दाखवला आहे. आता आम्ही वारंवार काय सिद्ध करावं? कितीवेळा आम्ही ओरडून ओरडून सांगणार? इतकं नाही बोलू शकत कोणी. आणि कदाचित आज मी माध्यमांशी शेवटचं बोलत आहे. उद्यापासून मी माध्यमांशीही बोलणार नाही. कारण माझे पती निर्दोष असताना आम्ही रोज रोज तेच तेच बोलून थकलो आहोत आता. मग आम्ही हे का सहन करु? आता हे असह्य होऊ लागलं आहे”.

हेही वाचा – “…म्हणून समीर वानखेडेंवर होत आहेत आरोप”; क्रांती रेडकरने दिलं आरोपांना उत्तर

समीर वानखेडेंच्या शैलीमुळे अनेकांना त्रास होत असल्यानं त्यांनी आरोप करण्यास सुरूवात केली असल्याची टीकाही क्रांतीने केली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना ती म्हणाली, “समीर वानखेडे हे गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या कामात कुठेही त्यांनी खोटेपणा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना काहीही अर्थ नाही. ट्विटरवर कोणीही काहीही बोलू शकतं. पण त्याला काहीतरी ठोस बाजू हवी. समीर यांच्या शैलीमुळे अनेकांना त्रास होत आहे. समीर यांच्यामुळे काही लोकांना आपले स्वार्थ साध्य करता येत नाहीयेत. म्हणून अशा प्रकारे आरोप करण्याचं काम सुरू आहे. मात्र ते निश्चितच या सगळ्यातून बाहेर पडतील. कारण विजय सत्याचाच होतो”.