मुंबई : गेल्या वर्षी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बेस्ट बसची मालकी असलेल्या दोन खासगी कंपन्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी एव्ही ट्रान्स (एमयूएम) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश कटीगंडला आणि मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम सूर्यवंशी यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले. चालक प्रशिक्षण, देखरेख आणि तैनातीमध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल बस चालक संजय मोरे यांच्यासह या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य आरोपी मोरे याला तीन वर्षांहून अधिक काळ बेस्ट बस चालविण्याचा अनुभव होता. त्यामुळे, मोरे याला बेस्टची बस चालवू देण्याचा अंतिम अधिकार हा बेस्ट उपक्रमाकडे होता. तसेच, मोरे याला दिंडोशी येथील बेस्ट आगारामध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असा दावा दोन्ही अधिकाऱ्यांच्या वतीने दोषमुक्तीची मागणी करताना केला होता. बेस्टला या प्रकरणात आरोपी करण्यात आले नाही. त्याऐवजी दैनंदिन कामकाज, भरती आणि अन्य जबाबदाऱ्यांसाठी थेट जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांना साक्षीदार करण्यात आले.

याशिवाय, या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, असा दावाही दोन्ही आरोपींनी अर्जात केला होता. न्यायालयाने दोन्ही अर्जदारांचा युक्तिवाद मान्य करून त्यांना प्रकरणातून दोषमुक्त केले.गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता कुर्ला पश्चिमेकडील एस.जी. बर्वे मार्गावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बेस्ट उपक्रमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले.