मुंबई : कुर्ला मदर डेअरीची २१ एकर जागा धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी देऊ नये या मुख्य मागण्यांसह अन्य काही मागण्यासाठी कुर्ल्यातील रहिवशांनी ‘लोक चळवळी’च्या माध्यमातून कुर्ला मदर डेअरी ते मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान दरम्यान १९ किमीची निवेदन पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी ८ वाजता रहिवासी जमणार तोच आयोजकांपैकी मुख्य चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि थेट आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तर कुर्ल्याच्या हद्दीतच पदयात्रा रोखण्यात आली. मात्र पोलिसांना चकवा देत २० ते २५ रहिवाशांनी धारावीपर्यंत पदयात्रा नेली. मात्र पोलिसांनी तेथेही पदयात्रेत सहभागी झालेल्या रहिवाशांना अडवले. तर दुसरीकडे ताब्यात घेतलेल्या चार जणांच्या शिष्टमंडळाने महसूल विभाग, दुग्ध विभाग आणि नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून १५ दिवसांत निवेदनावर उत्तर देऊ, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

धारावी पुनर्विकासाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला मदर डेअरची २१ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) देण्यात आली आहे. मात्र ही जागा धारावीसाठी देण्यास कुर्लावासियांचा तीव्र विरोध आहे. या जागेवर उद्यान तयार करण्याची मागणी कुर्ल्यातील रहिवाशांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी ‘लोक चळवळी’च्या माध्यमातून जनआंदोलन उभारले आहे. मात्र सरकार कुर्ला मदर डेअरीच्या जागेत घरे बांधण्यावर ठाम आहे. त्यामुळेच आता या जागेवरी शासकीय कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देऊन पुढील कार्यवाही करण्याची घाई डीआरपी आणि अदानी समुहाच्या कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी असून २१ एकर जागा वाचविण्यासाठी ‘लोक चळवळी’ने थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरच धडकण्याचा निर्णय घेतला.

‘लोक चळवळी’ने बुधवारी एका पत्रकार परिषद आयोजन करून कुर्ला मदर डेअरी ते वर्षा निवासस्थान दरम्यान १९ किमीच्या निवेदन पदयात्रेची घोषणा केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी ८ वाजता लोक जमणार तोच पोलिसांनी ‘लोक चळवळी’च्या चार प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे चार तास ठेवले. पण काही रहिवासी धारावीपर्यंत गेले. तिथे धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. मात्र त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे ‘वर्षा’पर्यंत निवेदन पदयात्रा पोहोचू शकली नाही. मात्र ‘लोक चळवळी’च्या शिष्टमंडळाने महसूल, दुग्ध विभाग आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

कुर्ला मदर डेअरीची जागा धारावीसाठी न देता तिथे उद्यान उभारण्यासह अन्य मागण्याचा निवेदनात समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार १५ दिवसांत सरकारकडून उत्तर मिळाले नाही, तर पुन्हा पदयात्रा काढू, असा इशारा ‘लोक चळवळी’चे कार्यकर्ते किरण पैलवान यांनी दिला.