मुंबई : कुर्ला येथील जय अंबिका नगरातील रहिवाशांना २०१९ पासून पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेला अनेक वेळा निवेदने देऊन, तक्रारी करूनही सकारात्मक बदल होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या एल विभाग कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढून प्रशासनाचे पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले.
कुर्ल्यातील अनेक भागांमधील नागरिक वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही या भागांमध्ये पुरेसे पाणी पुरविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. यापूर्वी अनेक वेळा महापालिकेकडे पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांनी तक्ररी केल्या आहेत. मात्र, परिस्थितीत बदल झालेला नाही. कुर्ल्यातील जय अंबिका नगरातील रहिवाशांना २०२९ पासून पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याचा अवधी देखील कमी असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. पूर्वी या भागात २ तास पाणीपुरवठा होत होता.
एका नळजोडणीतून १० कुटुंबांना पाणीपुरवठा होतो. मात्र, आता केवळ ३० मिनिटेच पाणी येत असून कोणालाही पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. याबाबत पालिकेला अनेक वेळा निवेदने दिली, तरीही पाण्याची समस्या जैसे थे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी पालिकेच्या एल विभाग कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढून पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली. महिलांनी हंडा डोक्यावर घेऊन पालिका कार्यालय गाठले. नागरिकांनी पालिकेच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबतची कारणे शोधून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. कुर्ल्यात पाण्याच्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून त्यावर प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. मात्र, त्यावर अंकुश नसल्याने अन्य नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पालिका कार्यालयावर हा चौथा हंडा मोर्चा काढण्यात आला आहे. यानंतर थेट न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी सांगितले.