मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी कामगार नेते व बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले असून गेले चार दिवस त्यांचे उपोषण सुरूच आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेला प्रस्ताव शशांक राव यांनी अमान्य केला असून उपोषण सुरूच ठेवले आहे. राव यांची प्रकृती गुरुवारी बिघडली. पोलिसांनी डॉक्टरही पाठवले होते. मात्र राव यांनी सलाईन लावण्यास नकार दिला.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी विविध संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली, राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला. मात्र बेस्ट उपक्रमाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. बेस्ट उपक्रम चालवण्यासाठी कोणीही अधिकारी या ठिकाणी नियुक्तीवर येण्यासही तयार नाहीत. त्यामुळे बेस्ट उपक्रम आणि या उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
कर्मचाऱ्यांना पगार मिळेल की नाही याची शाश्वती नसते, प्रवाशांना बसगाड्या वेळेवर मिळत नाहीत, सेवानिवृत्तांना त्यांची देणी मिळत नाहीच. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव सोमवार, १० नोव्हेंबरपासून ग्रॅन्ट रोड येथील आपल्या संघटनेच्या कार्यालयात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा गुरुवारी चौथा दिवस होता. राव यांची प्रकृती गुरुवारी दुपारी खालावली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे डॉक्टर पाठवले होते. त्यावेळी तपासणीत त्यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने सलाईन लावण्याचा सल्ला दिला होता. मात्र राव यांनी त्याला नकार दिला.
ग्रॅन्ट रोड येथील केनेडी ब्रीजजवळ असलेल्या कार्यालयात राव उपोषणाला बसले आहेत. दरदिवशी या ठिकाणी मोठ्या संख्येने बेस्टचे कामगार त्यांना भेटायला येत आहेत. या उपोषणाचे लाईव्ह चित्रिकरण कामगारांना पाहता यावे यासाठी समाजमाध्यमाचा वापर करण्यात आला असून हे उपोषण २४ तास पाहता येण्याची सोय केली आहे. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी राव यांची भेट घेतली व सेवानिवृत्त कामगारांची सात टक्के ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केले. तसेच उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र बेस्टचा हा प्रस्ताव राव यांनी अमान्य केला असून ठोस आश्वासने मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
या आहेत मागण्या
बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्या कायमस्वरूपी राखाव्यात, बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची थकित रक्कम तातडीने देण्यात यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी व महापालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला प्रलंबित वेतनकरार तातडीने करावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. अनेकदा या मागण्यांबाबत पाठपुरावा करूनही आजतागायत कोणताही सकारात्मक निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन करीत असल्याचे राव यांचे म्हणणे आहे.
भाजपचीच सत्ता, तरीही उपोषणाची वेळ
विशेष म्हणजे शशांक राव सध्या भाजपमध्ये असून बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. भाजपशी जवळीक असलेल्या राव यांची संघटना जिंकल्यामुळे बेस्टला चांगले दिवस येतील अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती.
