मुंबई : दुर्घटनाग्रस्त एअर इंडिया विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पवई येथील जलवायू विहार इमारत परिसरात शोककळा पसरली आहे. इमारतीचे रहिवासी अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुमीत प्रेमळ, सुस्वभावी असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. सुमीत यांच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी टाटा प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन डिएनए चाचणीसाठी नमुने घेतले.

अहमदाबाद येथे एअर इंडियाचे लंडनला जाणारे एआय १७१ (बोईग ड्रिमलायनाल ७८७८) हे विमान सरदार पटेल विमानतळाजवळच कोसळले. त्या अपघातात विमानातील २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानाचे वैमानिक सुमित सभरवाल (५६) हे होते. ते एअर इंडियामध्ये लाईन ट्रेनिंग कॅप्टन या पदावर होते. पवई येथील जलवायू विहार या संकुलात ते वडिलांसह रहात होते. त्या संकुलात वायू दलातील अधिकारी आणि कर्मचारीही वास्तव्यास आहेत.

सुमीत यांचे वडील वयाच्या नव्वदीच्या घरात आहेत. अपघाताची बातमी कळल्यापासून त्यांच्या इमारतीच्या परिसरात शोककळा पसरली आहे. सुमित यांची बहिण आणि तिची दोन मुले दिल्लीहून घरी आले आहेत. ते वडिलांकडे आहेत. शुक्रवारी इमारतीच्या आवारात सुन्न कऱणारी शांतता जाणवत होती. पवई पोलिसांनी इमारतीच्या आवारात बंदोबस्त ठेवला आहे. वडील वयोवृध्द आणि एकटेच घरात असल्याने कुणालाही त्यांना भेटण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

या इमारतीत सुमितच्या शेजारी राहणारे निवृत्त विंग कमांडर संजीव पै यांनी सांगितले, सुमीतचा मृत्यू हा एअर इंडियाची सर्वात मोठी हानी आहे. सुमीत एक उत्तम वैमानिक होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एकदाही कसलीही तक्रार आली नव्हती. त्याला बोल लावावे असे एकही कृत्य त्याच्या हातून घडले नव्हते. सुमीत अत्यंत सुस्वभावी होते. तो शांत आणि प्रेमळ होते, अशा त्यांच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. त्यांच्या आठवणी सांगताना त्यांना गहिवरून आले होते. अशी दुर्देवी घटना पुन्हा घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात, असे तेथील अन्य रहिवाशाने सांगितले.

सुमीत नेहमी संध्याकाळी आपल्या वडिलांना खाली फिरविण्यासाठी घेऊन येत. त्यांचे वडिलांवर खूप प्रेम होते आणि त्यांची काळजी घेत, असे जलवायू विहार इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले. ते खूप प्रेमळ होते असे सुरक्षा रक्षक यादव यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिएनए नमुने तपासणीसाठी

सध्या अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवााशांच्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हे मृतदेह जळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी डिएनए नमुन्यांचा आधार घेतला जाणार आहे. शुक्रवारी टाटा प्रयोगशाळेच्या कर्मचार्यांनी सभरवाल याच्या निवासस्थानी भेट देऊन डिएनए तपासणीसाठी काही नमुने ताब्यात घेतले. सुमीत सभरवालच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढील अंतिम संस्कारासाठी मुंबईत आणला जाणार आहे.