वेगमर्गादा ओलांडणाऱ्यांचा ‘स्पीड’ वाढला
मुंबईच्या रस्त्यांवर भरधाव वेगाने वाहने चालवून वेगमर्यादेच्या नियमांना पायदळी तुडवणाऱ्या सुमारे २० लाख वाहनांवर ‘नजर’ ठेवण्यासाठी अवघ्या सहा ‘स्पीड गन’ असल्याचे समोर आले आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्याची यंत्रणा वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने नियमांचे उल्लंघन करणारे अनेक वाहनचालक कायद्याच्या कचाटय़ातून सुटत होते. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात ३१ स्पीड गन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र त्यापकी सध्या केवळ सहा ‘स्पीड गन’ कार्यरत असल्याचे समजते.
सध्या मुंबई व उपनगरात आठ लाख चारचाकी तर २० लाख दुचाकी आहेत. या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी केवळ अडीच ते तीन हजार वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. वाहनांच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी असल्याने काही वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या निधीतून वेगमर्गादा ओलांडणाऱ्या चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण ३१ ‘स्पीड गन’ उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र सध्या यापकी केवळ सहा कार्यरत असल्याने वेगमर्गादा ओलांडणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा सप्टेंबर अखेपर्यंत वेग मर्यादा ओलांडणाऱ्यांची संख्या आठ हजार १७२वर नोंदवण्यात आली. त्यापकी केवळ दीड हजार दुचाकी चालकांवर कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांना यश आले आहे. याबाबत एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला विचारले असता, ‘स्पीड गन’ दुरुस्ती प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तर राज्यात रस्ता अपघातांच्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ४४ हजार ३८२ अपघातांची नोंद झाली होती.
यात वेगमर्यादा ओलांडल्याने अपघात झाल्याची संख्या अधिक होती. त्यामुळे शहराच्या सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्यावरून धावणाऱ्या सर्व वाहनांचा वेग टिपणाऱ्या ‘स्पीड गन’ आवश्यक असल्याचे जाणकर सांगतात. या यंत्रांच्या मदतीने भरधाव वाहनाचा क्रमांक, वाहनाचा वेग ही माहिती नोंदवली जाते. त्यामुळे वेगमर्गादा मोडणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाते. याशिवाय वाहनचालकांची नोंदही राहत असल्याने कारवाई करण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.

दंड अपुरा
‘मोटार वाहन कायद्या’अंतर्गत वाहतुकीची वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांना ५०० रुपये दंड आकारला जातो. हा दंड कमी असल्याने वाहनचालक विशेतष: तरुणमंडळी कायदा मोडत असल्याची प्रतिक्रिया अधिकारी व जाणकारांनी नोंदवली आहे.