मुंबई : जागतिक महिलादिनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे अनुदान हस्तांतरित केले जाईल, असे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते. पण महिलादिनी अडीच कोटी महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचे अनुदान हस्तांतरित करण्यात आले. येत्या दोन दिवसांत मार्चचे अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा लाभ थेट बँकेत जमा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. फेब्रुवारीच्या लाभाची रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर मार्चच्या लाभाची रक्कम हस्तांतरित केली जाईल, असे सांगणयात आले. काही तांत्रिक अडचणींमुळे दोन महिन्यांचे अनुदान एकदम हस्तांतरित करता आले नाही.

महायुती सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेसाठी राज्यातील दोन कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी अर्ज केले आहेत. डिसेंबरमध्ये दोन कोटी ४६ लाख लाडक्या बहिणींना या योजनेतील लाभ दिला गेला. जानेवारीत या योजनेच्या पडताळणीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. जानेवारीत ही संख्या पाच लाखाने कमी झाल्याने दोन कोटी ४१ लाख लाडक्या बहीणींना लाभ मिळाला. फेब्रुवारीत ही संख्या आणखी कमी होईल असे गृहीत धरले जात असताना फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या दोन कोटी ५२ लाख असल्याचे तटकरे यांनी दोन्ही सभागृहांत जाहीर केले.

आठ मार्चच्या महिलादिनी दीड कोटी लाडक्या बहीणींच्या खात्यात एक महिन्याचे अनुदान जमा झाल्याची महिती महिला विकास विभागाच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिली. महिलादिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तटकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष रुपे कार्डचे अनावरण करण्यात आले.

दिल्लीतील महिलांना प्रतिमहिना अडीच हजार रुपये

दिल्ली : दिल्लीतील भाजप सरकारने महिला समृद्धी योजनेला शनिवारी मान्यता दिली. याद्वारे दिल्लीतील अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना प्रतिमहिना अडीच हजार रुपये मिळतील. या योजनेसाठी ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेच्या नोंदणीसाठी तातडीने सुरुवात होईल. त्यासाठी एक संकेतस्थळ असून, लाभार्थींसाठी काही अटी असल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या मदतीने सुलभपणे ही रक्कम वितरित होईल असे दिल्ली सरकारने स्पष्ट केले.

महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय व कन्यारत्न सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते .यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२१०० रुपये देण्याची आठवले यांची मागणी

पुणे : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम १५०० रुपयांहून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावे, अशी मागणी करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.