मुंबई: लाडकी बहीण योजनेला ई – केवायसीची अट टाकल्याने त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपये सन्माननिधी जमा होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र केवायसीसाठी दोन महिन्यांचा अवधी असल्याने सध्या या दोन महिन्यांसाठी ही अट शिथिल करण्यात आळी आहे. त्यामुळे शुक्रवारपासून या महिलांच्या खात्यात दिवाळी आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १ कोटी महिलांनी ईकेवायसी पूर्ण केले आहे.
लाडक्या बहिणींना गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यात जमा होणार की नाही, असा प्रश्न या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पडला होता. मात्र सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करत महिला आणि बालविकास विभागाकडे ४१० कोटी रुपयांचा निधी वर्ग केला. त्यानंतर आज शुक्रवारपासून या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे.
महिला आणि बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी दोन महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई केवायसी प्रकिया पूर्ण केली आहे. मात्र उर्वरित महिलांना केवायसी अभावी ही रक्कम मिळणार की नाही? अशी शंका उपस्थित केली जात होती. परंतु ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत असल्याने सर्व पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याचे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
ईकेवायसीमधील अडचणी दूर करणार
अनेक महिलांना ईकेवायसी करण्यात अडचणी येत आहेत. अनेक महिलांना ओटीपीच येत नाही. त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आहे. त्याचप्रमाणे वडीलही हयात नाहीत अशा महिलांना ईकेवायसी करण्यात मोठी अडचण निर्माण होत असून याबाबत महिला व बालविकास विभागाकडे तक्रारी येत आहेत. या तांत्रिक बाबीही येत्या काही दिवसांत दूर केल्या जातील. ईकेवायसीतील या तांत्रिक बाबीही दूर केल्या जातील, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.