मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून मुंबई व आसपासच्या भागातील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भव्य गणेशमूर्ती मंडपात नेल्या जात आहेत. लालबाग – परळच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आज मुंबईसह आसपासच्या परिसरातील विविध ६० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य गणेशमूर्तींची आगमन मिरवणूक निघत आहे.

मुंबईत प्रामुख्याने लालबाग व परळ भागात मोठ्या गणेशमूर्तींचे कारखाने आहेत. परळ कार्यशाळा, करीरोड जवळील ‘गणसंकुल’, भायखळा जवळील बकरी अड्डा येथील गणेशमूर्ती कार्यशाळा आदी विविध ठिकाणाहून बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपांच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. गणेशोत्सवाला उरलेले अवघे काही दिवस आणि रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ढोल – ताशांच्या गजरात, बॅंजोच्या तालावर आणि गणरायाचा जयघोष करीत भव्य गणेशमूर्ती मंडपात नेल्या जात आहेत.

लालबाग – परळच्या रस्ते गर्दीने फुलले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेषतः परळ रेल्वे कार्यशाळा म्हणजेच परळ वर्कशॉपच्या मैदानातील गणेशमूर्ती कार्यशाळेबाहेरील रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

गणेशमूर्ती पाहण्यासाठी आणि गणरायाचे रूप कॅमेरात कैद करण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळत आहे. याप्रसंगी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना वारंवार सूचना केल्या जात आहेत. काही प्रमाणात वाहतूक कोंडीही पाहायला मिळत असून पोलिसांकडून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच लालबाग – परळमधील गर्दी पाहून नागरिकांकडून पर्यायी मार्गांचाही वापर केला जात आहे.

दरम्यान, आज लालबाग – परळ, शिवडी, काळाचौकी, ताडदेव, खेतवाडी, धारावी, मीरा रोड – भाईंदर आदी मुंबईतील विविध भागातील व आसपासच्या उपनगरातील विविध ६० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य गणेशमूर्तींचे आगमन मिरवणूक निघत आहे.