मुंबई : विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही, तर अनेक विद्यार्थ्यांना पर्याय भरता न आल्याने त्यांना पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली नाही. मात्र तिसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज भरता यावा व त्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी त्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अखेरची संधी देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) घेतला आहे.

विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, तिसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सीईटी कक्षाने २४ ते २७ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत सीईटी कक्षाकडे अर्ज व विनंती केली होती. याची दखल घेऊन ज्या उमेदवारांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरता आला नाही त्यांना अर्ज भरता यावा आणि तिसऱ्या फेरीत सहभागी होता यावे, तसेच महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी अखेरची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विधि तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी आता १ ते ३ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज व महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

नवीन महाविद्यालयाला मान्यता

विधि तीन वर्ष व पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारकडून कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर येथील वारणा विद्यापीठांतर्गत ‘वारणा स्कूल ऑफ लॉ’ या नवीन महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार तिसऱ्या फेरीमध्ये हे महाविद्यालय समाविष्ट करण्यात आले असून, या महाविद्यालयाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे.