ठाण्याचे माजी सहपोलीस आयुक्त तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात(सीबीआय) महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या व्ही. व्ही. लक्ष्मीनारायणन यांनी आंध्र प्रदेशातील चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनासेना पक्षात प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी निवडणूक ते लढण्याची शक्यता आहे. टी. चंद्रशेखर आणि रामाराव या दोन मूळच्या आंध्रच्या पण महाराष्ट्राच्या सेवेतील अधिकाऱ्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण दोघेही अपयशी ठरले होते.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र व वायएसआर पक्षाचे संस्थापक जगन मोहन यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटक करण्याची कारवाई तत्कालीन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक लक्ष्मीनारायणन यांनी केली होती. याशिवाय कर्नाटकातील खाणसम्राट जगन्नाथ रेड्डी आणि त्यांच्या भावाची चौकशी लक्ष्मीनारायणन यांनी केली होती. ठाण्याचे सहपोलीस आयुक्तपदी असताना सुरज परमार आत्महत्याप्रकरणी चार नगरसेवकांच्या अटकेची कारवाईही लक्ष्मीनारायणन यांनी केली होती. ठाण्यातील डान्सबारही त्यांनी बंद केले होते.

ठाण्यातून बदली झाल्यावर त्यांना चांगल्या पदावर नियुक्ती होईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण राज्य सरकारने पोलीस महासंचालक कार्यालयात दुय्यम दर्जाच्या पदावर त्यांची नियुक्ती केली होती.

गेल्या वर्षी लक्ष्मीनारायणन यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली होती. आंध्र प्रदेशात त्यांनी समाजकारण सुरू केले होते. प्रजाराज्यम पक्षाचे संस्थापक चिरंजीवी यांचे बंधू व चित्रपट अभिनेते पवन कल्याण यांनी स्थापन केलेल्या जनासेना पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. निवडणूक लढविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

टी. चंद्रशेखर यांनी सेवानिवृत्ती पत्करल्यावर २००९ची निवडणूक आंध्रमधील गुंटूर मतदारसंघातून प्रजाराज्यम पक्षाच्या वतीने निवडणूक लढविली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. माजी गृहनिर्माण सचिव रामाराव यांनीही आंध्रतून नशीब आजमविले होते, पण त्यांनाही अपयश आले होते. आता लक्ष्मीनारायणन हे रिंगणात उतरणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxminarayanan retired police officer in politics
First published on: 19-03-2019 at 02:40 IST