मुंबई : भांडुप पश्चिम येथील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्यानजीक गुरुवारी सकाळी १८०० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीतून अचानक गळती सुरू झाली. ही बाब निदर्शनास येताच महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. तसेच, जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी भांडुपमधील अनेक भागांमधील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> महालक्ष्मी रेसकोर्सवरील आंतरराष्ट्रीय थीम पार्कचा अद्याप निर्णय नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
गळती रोखण्यासाठी हाती घेतलेल्या दुरुस्ती काम सुरळीत पार पडावे यासाठी जलवाहिनीतील पाण्याचा दाब कमी करणे गरजेचे आहे. तसेच भांडुप कॅबिन येथील तानसा पश्चिम जलवाहिनीवरील झडप बंद करणेही आवश्यक आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे १२ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, पालिकेच्या एस विभागातील भांडुप पश्चिमेकडील डोंगराळ भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने श्रीरामपाडा, तुळशेतपाडा, वाघोबावाडी, रामनगर, तानाजीवाडी , रावते कंपाऊंड, त्रिमूर्ती नगर, शिवाजी नगर, नरदास नगर, टेंभीपाडा, साई हिल, साई विहार, सोनापूर येथील काही भाग, खिंडीपाडा, गांव देवी रोड, गाव देवी टेकडी, मरोडा हिल, पाटकर कंपाऊंड, गणेश नगर, सर्वोदय नगर तसेच भांडुप जलाशय येथून होणारा पाणीपुरवठा, रमाबाई नगर पंपिंग, महात्मा फुले नगर पंपिंग सप्लाय व डांबर कंपनी या भागांचा समावेश आहे. जलवाहिनीच्या दुरुस्ती कालावधीत संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याकडून करण्यात आले आहे.