मोतीलाल नगर पुनर्विकासात खासगी विकासकाला ६६.४९ टक्के वाटा तर मंडळाला १३.२६ टक्के क्षेत्र
मंगल हनवते
मुंबई : महत्त्वाकांक्षी अशा मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी अंदाजे ३३ हजार घरे उपलब्ध होतील, असा दावा म्हाडाकडून केला जात होता. मात्र आता हा दावा खोटा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुनर्विकासाअंतर्गत मंडळाला एकूण २८,८७,६०० चौ. मीटर क्षेत्रफळापैकी केवळ १३.२६ क्षेत्र म्हणजे ३,८३,००० चौरस मीटर क्षेत्र हिस्सा म्हणून उपलब्ध होणार आहे. पुनर्विकास प्रकल्प राबविणाऱ्या खासगी विकासकाला मात्र ६६.४९ टक्के म्हणजेच १९,२०,२०० चौ. मीटर क्षेत्र विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यातून ३३ हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता नाही.
१४३ एकरवरील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा खर्च ९,७०० कोटी रुपयांवरून ३६,२५० कोटी रुपयांवर गेल्याची माहिती नुकतीच म्हाडाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली. आता न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसारच मोतीलाल नगर पुनर्विकासातून म्हाडाला सोडतीसाठी उपलब्ध घरांच्या संख्येत घट होणार असल्याचे उघडकीस आले आहे. प्रकल्प सल्लागाराने तयार केलेल्या आराखडय़ानुसार मंडळाला चार चटईक्षेत्र निर्देशांकानुसार अंदाजे ३३ हजार घरे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नव्या माहितीनुसार, म्हाडाला येथून १० हजार घरेही उपलब्ध होण्याची शक्यता नाही. मंडळाने न्यायालयात दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली आहे. मुळात याआधी मुंबई मंडळ बीडीडीच्या धर्तीवर स्वत: पुनर्विकास करणार असल्याने म्हाडा मंडळाला ३३ हजार घरे मिळणार होती. पण प्रकल्पाचा खर्च झेपणार नसल्याचे कारण पुढे करीत खासगी विकासकाकडून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रियेनुसार जो विकासक अधिक हिस्सा मंडळाला देईल त्याला कंत्राट दिले जाणार आहे. एकूणच आता पुनर्विकासात विकासकाचा हिस्सा आल्याने आणि खर्चाचा भार विकासक उचलणार असल्याने त्याला मोठा हिस्सा मिळणार आहे. दुसरीकडे मंडळाचा हिस्सा कमी होणार आहे. मोतीलाल नगर येथे विकासासाठी एकूण २८,८७,६०० चौ. मीटर इतके क्षेत्र उपलब्ध होणार असून चार चटई क्षेत्र निर्देशांकानुसार जागेचा विकास केला जाणार आहे. यातील ५,८४,४०० चौ. मीटर जागेवर (२०.३३ टक्के) ३७०० मूळ भाडेकरू तसेच १६०० झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. विकासकाला १९,२०,२०० चौ. मीटर (६६.४९ टक्के) क्षेत्र विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्याच वेळी म्हाडाला ३,८३,००० चौ. मीटर क्षेत्र (१३.२६ टक्के) उपलब्ध होणार आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर करून येथे बांधकाम केल्यास म्हाडाला सात ते आठ हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत मोतीलाल नगर विकास समितीने नाराजी व्यक्त करीत म्हाडानेच पुनर्विकास करावा, अशी मागणी केली आहे.
हा केवळ अंदाज!
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी यावर बोलण्यास नकार दिला. असे असले तरी मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने न्यायालयात मांडलेली माहिती हा एक अंदाज आहे. मंडळाला ३,८३,००० चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात किती क्षेत्र उपलब्ध होणार हे व्यावसायिक निविदा खुली केल्यानंतरच समजेल.
अधिकाऱ्यांकडूनही नाराजी
निविदा अंतिम होतानाच मंडळाचा हिस्सा निश्चित होणार असे सांगितले जात असले तरी मुळात प्रकल्पाचा खर्च पाहता हिस्सा कमी असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर मंडळानेही १३.२६ टक्क्यांची अपेक्षा केल्याने मंडळाला कमी घरे उपलब्ध होणार असल्याची चर्चा म्हाडात आहे. याबाबत काही अधिकाऱ्यांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.