मुंबई : राज्य शासनाने मद्याचे दर वाढविल्याने त्याचा फटका बार ॲण्ड रेस्टॉरंटला बसला आहे. ग्राहक बारमध्ये मद्य पिण्यापेक्षा वाईन शॉपमधून मद्य विकत घेण्यास पसंदी देत आहेत. मद्याच्या वाढलेल्या प्रचंड किंमतीमुळे बार ॲण्ड रेस्टॉरटंचा व्यवसाय जवळपास ५० टक्क्यांनी घटला आहे.

सरकारला निधीची चणचण भेडसावत आहे. त्यात लाडकी बहिण योजनेेचा मोठा आर्थिक भार पडला आहे. तो भरून काढण्यासाठी, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाने मद्यांच्या किमतीत वाढ केली आहे. मद्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे भारतात बनवलेले पण परदेशी शैलीतील मद्य (आयएमएफएल) आणि दुसरा प्रकार म्हणजे थेट परदेशातून आयात केलेले विदेशी मद्य (फॉरेन लिकर). शासनाने प्रामुख्याने या दोन प्रकारांच्या मद्यांच्या किंमतीतच वाढ केली आहे. भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (आयएमएफएल) आणि देशी मद्य यावरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी), मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि परवाना शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या करवाढीमुळे राज्य शासनाला अंदाजे १४ हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळणार आहे.

दर किती वाढले ?

देशी मद्यावरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १८० वरून २०५ रुपये एवढे वाढवले आहे तर प्रीमियम विदेशी मद्याची किंमत वाढवून ३६० रुपये करण्यात आली आहे. आयएमएफएल मद्याच्या उत्पादन खर्चाच्या ३ पट असलेला कर आता ४.५ पट करण्यात आला आहे.

बारऐवजी कारमध्ये मद्य प्राशन

मद्याच्या किंमती वाढविल्याचा सर्वाधिक फटका बिअर बारचालकांना बसला आहे. वाईन शॉपमधे मिळणारे मद्य बारमध्ये महाग झाल्याचे बार मालक अमित शेट्टी यांनी सांगितले. किंमती वाढल्याने ग्राहकांनी बारमध्ये जाऊन मद्य पिण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यापेक्षा वाईन शॉपमधून मद्य घेऊन घरी, सार्वजनिक ठिकाणी पिण्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळे बार चालकांच्या धंद्यावर ५० टक्के परिणाम झाला आहे.

उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड विस्की १८० रुपयांना मिळत होती. आता ती २४० रुपयांना मिळते. बारमध्ये तिच्या किंमतीत ५० टक्के वाढ झाली. त्यामुळे बारमध्ये तिच विस्की ३५० रुपयांना मिळू लागली आहे. म्हणून अनेक जण बारमध्ये मद्य पिण्याऐवजी वाईन शॉपमधून मद्य घेण्यास पसंती देत आहेत. याबाबत बार मालकांनी संताप व्यक्त केला आहे. वाईन शॉपमधून घेतलेले मद्य बारमध्ये ६० रुपयांनी महाग होते. १८० रुपयात मद्य पिणारा ३५० का देणार ? असा सवाल बारमालकांनी केला आहे. एरवी १०-२० रुपयांची वाढ काहीच वाटली नसली. परंतु या वाढीमुळे मद्य पिणाऱ्यांचे ५०० रुपयांचे बिल हजार रुपयांवर गेले आहे.

धंदा निम्यावर

मद्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे बार ॲण्ड रेस्टॉरटंचा धंदा निम्म्यावर आला आहे. ग्राहकांची वाट बघत बसावी लागले. धंदा होत नसल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर होणार आहे. आमचा धंद होत नसल्याने जादा कर्मचारी ठेवणे परवडणार नाही. त्यामुळे कर्मचारी कपात करावी लागेल, अशी भीती बार मालक अमित शेट्टी यांनी व्यक्त केली.