मुंबई : सागरी किनारा महामार्गाला लागून असलेल्या समुद्री पदपथाचा काही भाग १५ ऑगस्टच्या सायंकाळपासून सुरू झाला असला तरी मुंबईकरांची पावले अजून या पदपथाकडे फारशी वळलेली दिसत नाहीत. समुद्री पदपथावर तुरळक संख्येने पादचारी दिसतात. एकतर समुद्री पदपथाचा अर्धाच भाग सुरू झाला असून या तेथे येणे हे सामान्य नागरिकांसाठी तितकेसे सोयीचे नसल्याची चर्चा आहे. पालिका प्रशासनाने मात्र या ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गालगतच भलामोठा विस्तीर्ण असा समुद्री पदपथ तयार करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात १५ ऑगस्टला हा समुद्री पदपथ खुला झाला. मात्र गेल्या दहा दिवसात या पदपथावर पादचाऱ्यांची अतिशय तुरळक गर्दी दिसते आहे. मरीन ड्राईव्ह येथील साडेतीन किमी लांबीच्या समुद्री पदपथापेक्षाही लांब असा समुद्री पदपथ अशी या पदपथाची ओळख करून दिली जाते. मात्र मरीन ड्राईव्ह येथे गर्दी उसळलेली असताना वरळीच्या या समुद्री पदपथाकडे मात्र मुंबईकर फारसे फिरकताना दिसत नाहीत. पदपथाचे काम पूर्ण झाले नसून अर्धाच भाग निवडणूकीच्या तोंडावर सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, समुद्री पदपथाला उत्तम प्रतिसाद असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. किती प्रतिसाद मिळाला याचे मोजमाप करता येत नसले तरी समुद्री पदपथावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी स्थानिक नागरिक येत असतात. तसेच शनिवार व रविवारी या परिसरातील वरळी येथील नव्याने सुरू झालेले वाहनतळ चांगलेच व्यापलेले असते असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच १५ ऑगस्टला पदपथ खुला झाला तरी त्यानंतर मुंबईत अतिवृष्टी झाली. त्यामुळे याठिकाणी अद्याप पर्यटक आलेले नाहीत. तसेच आता सण उत्सवामुळे पर्यटक येत नाहीत. सण संपल्यावर या ठिकाणी गर्दी वाढेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हा पदपथ नव्याने सुरु झाला असून अजून मुंबईकरांना याबद्दल फारसे माहीत नसल्यामुळे आठवड्याच्या मधल्या दिवसात इथे गर्दी नसते असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहेत.
अर्धवट कामे करू नका
या समुद्री पदपथाकडे जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग नसल्यामुळे या पदपथाला प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. समाजमाध्यमांवर लोकांनी या बाबतच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बीएमसी प्लीज डोण्ट सर्व हाफ बेक्ड फॅसिलिटीज अर्धवट सोयीसुविधा देऊ नका असे खोचक सल्लेही नागरिकांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
सात किमीमधील केवळ सव्वा पाच किमीचा पदपथ सुरु
सागरी किनारा मार्गाला लागून असलेला सर्वात मोठा पदपथ साडेसात किमी लांबीचा असला तरी त्यापैकी केवळ सव्वा पाच किमी लांबीचाच पदपथ सुरू झाला आहे. प्रियदर्शीनी पार्क ते हाजीअली (अडीच किमी) आणि बडोदा पॅलेस ते वरळी (अडीच किमी) एवढ्याच भागातील पदपथ सुरू झाला आहे. तर हाजीअली ते बडोदा पॅलेस हा भाग साधारण दीड किमीचे असून तो होण्यास अद्याप दोन वर्षे लागणार आहेत. तर वरळी ते एनएस त्राता हा सातशे ते साडे सातशे मीटरचा भाग झालेला नाही तो सहा महिन्यात होण्यात शक्यता आहे. हाजीअली ते बडोदा पॅलेस या भागात वाहनतळाचे काम सुरू असल्यामुळे हा भाग होण्यास दोन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे सलग पदपथ सुरू झालेला नाही.