स्थानिकांच्या विरोधामुळे पालिकेसमोर पेच; ‘प्रतीक्षा’चा भाग वगळून जुहूतील रस्त्याचे काम करण्याच्या हालचाली

वाढती वाहनसंख्या आणि वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी मुंबई महापालिकेने रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहे. मात्र, जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोरील रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. मूळचा चाळीस फुटी रस्ता ६० फुटी करण्यासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्यासह त्या रांगेतील अन्या निवासस्थानांची दहा फूट जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. मात्र, याला स्थानिकांनी विरोध केल्याने आजूबाजूचे रुंदीकरण होऊनही या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कायम आहे. त्यामुळे पेचात पडलेल्या पालिकेने आता ‘प्रतीक्षा’ला बगल देऊन रुंदीकरणाचा विचार चालवला आहे.

जुहू येथील ईस्ट वेस्ट मार्ग ३ म्हणजेच ज्ञानेश्वर मार्ग हा रस्ता ४० फूट असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दहा फूट रुंदीकरण करणे प्रस्तावित आहे. गुरुनानक रोड ते देवानंद बंगल्याला जोडणाऱ्या या रस्त्याच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला आहे. या बंगल्याच्या अंगणातील दहा फुटांपर्यंतचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. प्रतीक्षासह या रस्त्यावरील सर्वच सोसायटय़ांना महापालिकेने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नोटिसा दिल्या आहेत. प्रतीक्षा बंगल्याचे मालक जया बच्चन आणि अजिताभ बच्चन यांनाही नोटीस गेली होती. ‘रस्ता विभागाकडून आलेल्या आराखडय़ानुसारच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दहा फूट रुंदीकरण करण्याचे ठरले आहे. या जागेच्या बदल्यात रहिवाशांना अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक किंवा विकास हस्तांतरण अधिकार देण्यात येतील,’ असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, याला स्थानिकांनी विरोध केला आहे.

याच भागातील अनुराधा सत्यमूर्ती रेसिडन्सीचे मालक के. व्ही. सत्यमूर्ती यांनी या नोटिशीविरोधात पालिका अधिकाऱ्यांना पत्र लिहून विरोध दर्शवला आहे. ‘आमच्या सोसायटय़ांच्या कुंपणभिंती महापालिकेच्या विकास आराखडय़ातील नियोजनानुसार बांधण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या पलीकडे इर्ला नाल्याशेजारी हिरवळीची जागा असून तिथे रस्ता रुंदीकरण करणे योग्य आहे. त्यासाठी आमच्या वाहनतळांची जागा तसेच अंगणातील मुलांची खेळण्याची जागा घेण्याची काय गरज आहे,’ असे सत्यमूर्ती यांनी सांगितले.

रुंदीकरणाला अमिताभ बच्चन यांनी खुलेपणाने विरोध दर्शवला नसला तरी, मधल्या काळात पालिकेत काही चक्रे वरिष्ठ पातळीवरून फिरली असल्याचे समोर येत आहे. आता प्रतीक्षाचा भाग वगळून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे समजते. या रुंदीकरणात रस्त्याच्या सुरुवातीला असलेल्या प्रतीक्षा बंगल्याचा भाग वगळून इतर रस्ता रुंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रस्त्याच्या सुरुवातीलाच असल्याने तेवढा भाग अरुंद राहिलेला चालेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अनधिकृत बांधकाम नियमित?

अमिताभ बच्चन यांच्यासह सहा जणांनी केलेले अनधिकृत बांधकाम पालिकेने नियमित केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. माहिती अधिकारातून यासंबंधीची माहिती उघड झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पी दक्षिण विभागाकडून आलेल्या पत्रानुसार अमिताभ बच्चन आणि राजकुमार हिराणी, ओबेरॉय रियालिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपी ५३(१) कायद्याअंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ अँड असोसिएट्स यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी सुधारित आराखडे मंजुरीकरिता पाठवल्यावर ते पी दक्षिण विभागागडून ६ मे रोजी नामंजूर करण्यात आले. यानंतर दुसऱ्यांदा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर ती कामे नियमित करण्यात आली, असा आरोप गलगली यांनी केला आहे.