मुंबई : भावभावनांचा सारीपाट कवेत घेण्याची ताकद असलेल्या कविता या साहित्य प्रकाराला भिडण्यासाठी मनही तितकेच तरल हवे. रंगभूमी आणि चित्रपट या प्रांतात मुशाफिरी करून आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांकडेही असेच संवेदनशील मन असते, याची प्रचीती घेण्याची संधी येत्या २८ फेब्रुवारीला रसिकांना मिळणार आहे.

‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अभिजात’ या उपक्रमाच्या रंगमंचावर नाना पाटेकर, किशोर कदम ‘सौमित्र’, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे आणि स्वानंद किरकिरे या शब्दहळव्या कलावंतांच्या कविता ऐकण्याची ही पर्वणी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी मिळणार आहे. या कलावंतांच्या बरोबरीनेच साहित्याच्या प्रांतात स्वत:ची खास प्रतिमा तयार करणाऱ्या अशोक नायगावकर, नीरजा आणि मिलिंद जोशी यांसारख्या कवींच्या कविताही रसिकांना अनुभवायला मिळतील.

मराठी कवितेत मानाचे पान असलेले बा. सी. मर्ढेकर लिहितात..

किती पायी लागू तुझ्या

किती आठवू गा तूते

किती शब्द बनवू गा

अब्द अब्द मनी येते

ही कवितेसाठीची भावना प्रत्येकाच्या मनात सतत तरळत असते. प्रत्यक्ष कवीच्या मुखातून या कवितेचा साक्षात्कार घेण्याची ही संधी मोलाची आणि महत्त्वाचीही. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेल्या या कविमनाची साद ‘अभिजात’च्या निमित्ताने उमटू शकणार आहे. पुढील शुक्रवारची ही संध्याकाळ त्यामुळेच संस्मरणीय ठरणार आहे.

तिला साद घालण्यासाठी ‘अभिजात’चे हे पहिले पर्व कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी नोंद घ्यावी असे.

काव्यांगणातील तारे..

नाना पाटेकर, किशोर कदम ‘सौमित्र’, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, स्वानंद किरकिरे, अशोक नायगावकर, नीरजा, मिलिंद जोशी.

प्रायोजक या कार्यक्रमाचे प्रायोजक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वर्ल्ड वेब सोल्यूशन्स’ असून, तन्वी हर्बल्स, एमआयडीसी आणि मँगो हॉलिडेज हे सहप्रायोजक आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रह्मविद्या साधक संघ पॉवर्ड बाय असलेल्या या कार्यक्रमाचे बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड़, नॉलेज पार्टनर नेटभेट ईलर्निग सोल्यूशन्स आणि टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा हे आहेत.