मुंबई : महेश एलकुंचवार यांच्यासारख्या ‘अभिजात’ लेखकाच्या साक्षीने उद्घाटन, माधुरी पुरंदरे, अरुणा ढेरे, अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, चंद्रकांत काळे, अंबरीश मिश्र, वैभव जोशी, वीणा गवाणकर, शरद बावीस्कर असे वाचकस्नेही कवी/लेखक, बेगम परवीन सुलताना, अश्विनी भिडे-देशपांडे, रोणु मुझुमदार, रोंकिणी गुप्ता, बेला शेंडे, प्रियांका बर्वे यांच्यासारख्या कलाकारांचे विशेष सादरीकरण, सुधीर पटवर्धन यांच्यासारख्या ज्येष्ठ चित्रकर्मीचा सहभाग, ‘लोकसत्ता’मधून दररोज ‘काय चाललंय काय’ विचारणारे प्रशांत कुलकर्णी, ‘लोकसत्ता’मधील लिखाणास चित्राकार देणारे नीलेश जाधव, प्रथितयश कलाकारांच्या पुढच्या पिढीचा ‘शागीर्द’, श्रीनिवास खळे यांच्या अमीट गाण्यांचा नृत्यात्मक आविष्कार साकारणाऱ्या सोनिया परचुरे, इतिहासाकडे नव्याने पाहणाऱ्या श्रद्धा कुंभोजकर, उदयोन्मुख लेखक/कवींची कार्यशाळा, साहित्य आणि मनाचे आरोग्य तपासणारे मानसोपचारतज्ज्ञ, नव्या पिढीचे कथालेखक…असे बरेच काही. ही केवळ नांदी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ची.
येत्या ३० ऑक्टोबरला मुंबईभर तब्बल आठवडाभर चालणाऱ्या या लिटफेस्टचा पडदा उघडेल. त्यानंतर मराठी संस्कृतीच्या श्रीमंतीचा हा सौंदर्योत्सव प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृह, पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे साजरा होईल. जगणे समृद्ध करण्यास आवश्यक वाङ्मय, चित्र, नाट्य, संगीत अशा क्षेत्रांचा कलात्मक आनंद या महोत्सवातून आकंठ लुटता येईल.
या महोत्सवाच्या निमित्ताने काही नव्या प्रयोगांचे भूमिपूजन होईल. जीए कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्यातील पत्रांचा रंगमंचीय आविष्कार (माधुरी पुरंदरे आणि गिरीश कुलकर्णी) या महोत्सवात प्रथमच सादर होईल. अनेक प्रश्नांवर टोकदार भूमिका असलेले कसदार अभिनेते अतुल कुलकर्णी आणि रंगभूमी/चित्रपट/ओटीटी माध्यमांत सशक्त कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णी हे प्रथमच यानिमित्ताने व्यासपीठावर एकत्र येतील. तसेच ‘जिगिषा’च्या ‘चिरंजीव पर्फेक्ट बिघडलाय’ या नव्या लेखकाच्या नव्या कोऱ्या नाटकाचा पहिला प्रयोग ‘लिटफेस्ट’मध्ये सादर होईल आणि अत्यंत गाजलेले ‘ऑल दि बेस्ट’ या महोत्सवात एक वेगळाच प्रयोग करेल. याच्या जोडीने ज्येष्ठ कवयित्रींचा ‘तिच्या कविता’ प्रशांत पवार, प्रणव सखदेव, अक्षय शिंपी, हेमंत राजपाध्ये, प्रदीप खोकरे, मधुगंधा दीक्षित, हिना कौसर खान, निखिलेश चित्रे, गणेश मतकरी, वैद्यकीय ‘साहित्य’ या विषयावर डॉ. अद्वैत पाध्ये, डॉ. शुभा थत्ते असे विविधांगी कार्यक्रम या ‘लिटफेस्ट’मध्ये सादर होतील. सर्व कार्यक्रम, त्यांचे स्थळ, वेळ आणि प्रवेशिका वितरण आदी तपशील लवकरच.