मुंबई : शास्त्रीय संगीतातील अलौकिक सूर, बेगम परवीन सुलताना यांच्यासारख्या दिग्गज गायिकेच्या गायनातून उलगडत गेलेली स्वरभाषा ते संध्याकाळच्या काहीशा पावसाने कुंद झालेल्या वातावरणात चैतन्य भरणाऱ्या मराठी मुशायरा या संगीत प्रकारापर्यंत नानारंगी, नानाढंगी कार्यक्रमांनी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा दुसरा दिवसही बहारदार केला. बेगम परवीन सुलताना व रोंकिनी गुप्ता यांच्या ‘दोन पिढ्यांची स्वरभाषा’ या गायन सत्राने महोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर कलांगण येथे चित्रकार नीलेश जाधव यांनी ‘गोष्टीतून चित्र’ उलगडणाऱ्या कलेचे इंगित रसिकांसमोर खुले केले.

एकीकडे काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या प्राचीन अशा पर्शियन इराणी ‘दास्तानगोई’ कथाकथन शैलीवर आधारित ‘दास्तान-ए-रामजी’ हा प्रयोग अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी सादर केला. तर त्याच वेळी मनमीत पेम, मयुरेश पेम आणि निखिल चव्हाण यांनी प्रचंड ऊर्जेने भारलेला ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा प्रयोग सादर केला. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या अश्विनी शेंडे, मंदार चोळकर आणि समीर सामंत या तीन तरुण गीतकारांनी ‘गीत हे कविता असते का?’ या चर्चासत्रात कविता आणि गाणी यांचे वेगवेगळे स्वरूप, कवी आणि गीतकार अशी दुहेरी ओळख जपताना येणारी आव्हाने अशा विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.

‘भुरा नंतरचे बाविस्कर’ या चर्चासत्रात तरुण लेखक, प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांचे विचार ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. तर ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्या बरोबरही यावेळी दिलखुलास गप्पा रंगल्या. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता सायंकाळी मंदार पिलवलकर आणि त्यांच्या युवा साथीदारांनी सादर केलेल्या मराठी मुशायराने झाली.

मराठी ही महाराष्ट्राची भाषा होऊ शकली नाही… – डॉ. शरद बाविस्कर यांची खंत, भाषेच्या राजकारणाचा उलगडा

मुंबई : ‘आपल्याकडे स्थानिक भाषेत ज्ञानव्यवहारासाठी सर्वांना सामावून घेणारा बौद्धिक अवकाश नाही. स्थानिक भाषेत, स्थानिक पातळीवर ज्ञानव्यवहार होत नाहीत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर प्रमाण भाषेचा आग्रह धरत आपण मराठीच्या इतर बोलींमधले अचूक शब्द सोडून देतो. पण त्यामुळेच ‘प्रमाण मराठी’ ही महाराष्ट्राचीच भाषा होऊ शकलेली नाही’, अशा शब्दांत डॉ. शरद बाविस्कर यांनी भाषेचे राजकारण उलगडले.

‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये ‘भुरानंतरचे बाविस्कर’ या कायर्क्रमात ते बोलत होते. एखादी भाषा वाढते तेव्हा ती इतर काही भाषांना मारते, याचे उदाहरण बाविस्कर यांनी फ्रेंच भाषेच्या उदाहरणातून दिले. भाषा शुद्ध ठेवण्याच्या आग्रहापोटी फ्रेंच भाषेने ब्रिटनसह ३० मोठ्या भाषा संपवल्या. त्यामुळेच मराठी भाषा तगवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धोरण, रूपरेषा नसेल तर मुंबईत मराठी बोललीही जाणार नाही. कदाचित प्रमाण मराठीने धोक्यात आणलेल्या बोलींसाठी मात्र प्रयत्न सुरू राहातील, कारण त्या-त्या भाषकांकडून भाषेसाठीचे हे युद्ध निरंतर सुरू असते, असा आशावादही बाविस्कर यांनी या वेळी व्यक्त केला.

आत्ममग्नता आणि आत्ममुग्धता या दोन्ही गोष्टी सारख्याच धोक्याच्या आहेत. चिकित्सा तसेच सर्वसमावेशक चर्चा होऊ शकेल ही ‘स्पेस’ आपल्याकडे नाही. याच मुलाखतीत ते म्हणाले, की साहित्यात देशीवादी राहून चालत नाही. तिथे आत्ममुग्धता अथवा शहामृगी वृत्ती टाळावी लागते. लोकशाही ही पाश्चात्य गोष्ट आहे, हा विचारच कसा भयंकर आहे, हे सांगून डॉ. बाविस्कर यांनी ज्ञानव्यवहार हा दोन्ही बाजूंनी कसा होत होता आणि आजच्या काळात आपली दारे बंद करून राहण्याची मुभा आपल्याला नाही, हे स्पष्ट केले. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ संपादक अभिजीत ताम्हणे यांनी ही मुलाखत घेतली.

जिथे आत्ममग्नता, तिथे संस्कृतींचा संघर्ष

– समाजातील चर्चाविश्व संकुचित होत गेले आहे. जिथे आत्ममग्नता असते, तिथे संस्कृतींचा संघर्ष होतो, तो टाळण्यासाठी समाजात समन्वय साधणारे राजदूत असायला हवेत. जिथे ते नसतात, तिथे यादवीसदृश परिस्थिती असते.

– सार्वजनिक अवकाश, चर्चाविश्व असेल तर यादवी होणार नाही. पण सार्वजनिक अवकाशाच्या शक्यता ठरवून संपवल्या जात आहेत. हा अवकाश नागरी समाजाचा प्राणवायू आहे. आजघडीला तो किमान आहे, पण तोच कमाल वाटतो, अशी परिस्थिती आहे. लोकांना हा अवकाश नको आहे, असे त्यांच्यावर लादले जाते, असेही डॉ. शरद बाविस्कर यांनी सांगितले.