मुंबई : ‘डावे आणि उजवे ‘फेक’ असतात. यासंदर्भात मी विवेकाला जे पटते तेच करतो. मी धर्माभिमान बाळगत नाही म्हणून उजवे मला डावे समजतात आणि डाव्यांनी तर मला कधीच टाकले आहे. म्हणून कडवे डावे आणि कडवे उजवे मला एकसारखेच वाटतात. आम्ही वाचणारे, लिहिणारे आहोत हाच साधा व्यवहार आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार महेश एलकुंचवार यांनी साहित्याला विचारधारेत तोलणाऱ्यांवर हल्लाबोल केला. ‘अन्य भाषांचे ज्ञान नसताना माझी भाषाच सर्वश्रेष्ठ असल्याचा दुराभिमान बाळगणे ही अस्मिता नव्हे अडाणीपणा’ असल्याचे परखड मतही त्यांनी ‘लोकसत्ता लिट फेस्ट’च्या मंचावरून व्यक्त केले.

मराठीच्या सांस्कृतिक संचितात भर घालणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन नाटककार आणि विचारवंत महेश एलकुंचवार यांच्या हस्ते गुरुवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या नेटक्या सोहळ्यात करण्यात आले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या बरोबर प्रसिद्ध लेखक आणि एलकुंचवारांच्या साहित्याचे अभ्यासक हिमांशू स्मार्त यांनी एलकुंचवार यांच्याशी संवाद साधला. मराठी साहित्याची सद्य:स्थिती, मध्यमवर्गीय मानसिकतेत अडकून पडलेले मराठी साहित्य, स्वतः भाषेचा अभ्यास न करता मराठी संपत चालली म्हणून ओरडणाऱ्या मराठी माणसाची दांभिकता, अध्यात्म म्हणजे काय, उपनिषदातून आलेले तत्त्वज्ञान अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा ऊहापोह एलकुंचवार यांनी या गप्पांतून केला.

लहानपणापासूनची जडणघडण आणि लिखाणातून होत गेलेली त्या विचारांची अभिव्यक्ती या संदर्भात बोलताना आपल्यावर कोणाचाही प्रभाव पडत नाही, कोणाचाही प्रभाव आपण स्वीकारत नाही, असे एलकुंचवार म्हणाले. ‘जिथे ज्ञान दिसते तिथे मात्र मन विनम्र होते. पण समोरची व्यक्ती ज्ञानी आहे की नाही, हे मी माझ्या कसोटीवर घासून घेतो’ असेही त्यांनी सांगितले.

‘कलेमध्ये जे जे अनावश्यक आहे ते असुंदरच असते, हे खरेतर लहानपणी वडिलांनी ज्या पद्धतीने वाढवले त्यातून मनावर संकर झाला होता. मात्र, नाटककार म्हणून लिखाण करताना विजयाबाई मेहता यांच्यासारख्या रंगकर्मीमुळे आपण कितीही सुंदर लिहित असलो तरी नाटकात त्याची गरज नसेल तर ते काढून टाकावे लागते. तरच तुमचे नाटक बांधेसूद होते, हे अनुभवातून आकळत गेले,’ असा अनुभव त्यांनी व्यक्त केला.

‘अभिजात लिटफेस्ट’च्या उद्घाटनप्रसंगी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन महेश एलकुंचवार यांचे स्वागत केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘लिटफेस्ट’मागची संकल्पना स्पष्ट केली. ‘ गेली ७ ते ८ वर्षे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ हा उपक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण काही ना काही कारणामुळे ते पुढे जात राहिले. आता या उपक्रमाला खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळाला,’ असे कुबेर म्हणाले. अभिजात मराठी साहित्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यासाठी महेश एलकुंचवार हेच अध्यक्ष म्हणून असायला हवेत, यामागेही निश्चित कारणे आहेत, असे सांगताना बाजारपेठी गरजांनुसार लेखन न करणारा, कुठल्याही एका विचारधारेला बांधून न घेणारा आणि भारतीय परंपरेची अथांगता समजून घेऊन ते लिखाणात उतरवण्याची विद्वत्ता असलेला एलकुंचवार यांच्यासारख्या विचारवंताच्या हस्ते लिटफेस्टचे उद्घाटन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

नऊ दिवस संस्कृतीचा गौरवोत्सव

एलकुंचवार यांच्या विचाराने आणि त्यांच्या उपस्थितीने भारलेल्या वातावरणात औपचारिक सुरुवात झाल्यानंतर १ नोव्हेंबरपासून ‘लिटफेस्ट’मधील कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्यानंतर ८ नोव्हेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर प्रांगण, कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, पार्ल्यातील लोकमान्य सेवासंघ, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ रंगणार आहे. प्राचीन परंपरा आणि रसरशीत वर्तमान असलेल्या मराठी काव्य, नाट्य, साहित्य, लोककला, शिल्प-चित्रकलेसारख्या विविध कलांमधील अभिजाततेचे दर्शन घडवणारे उपक्रम या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहेत.