मुंबई : ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ या साहित्यिक, सांस्कृतिक, सांगीतिक आणि विविध कलांचा समृद्ध अनुभव देणाऱ्या कार्यक्रमाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात शीव येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी आणि दृश्य कला महाविद्यालय आणि रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

नाट्यमंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वासुदेवाच्या प्रतिकृतीपासून नाट्यगृहाच्या प्रवेशापर्यंत ठेवण्यात आलेल्या विविध कलाकृतींसाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या सर्व कलाकृती शुक्रवारी ठाण्यातही पाहता येणार आहेत.

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी आणि दृश्य कला महाविद्यालयाच्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मध्ये कला सादर करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. महाविद्यालयातील व्हिज्युअल आर्ट विभागाच्या पहिल्या वर्षातील सात विद्यार्थ्यांनी क्विलिंग म्हणजेच कागदाच्या पातळ रंगीत पट्ट्या गुंडाळून, दुमडून मंगेश पाडगांवकर यांची आकर्षक कलाकृती तयार केली. तसेच, स्वयंम पांचाळ याने प्रसिद्ध लेखक द. मा. मिरासदार यांचे व्यंगचित्र रेखाटले. तर, अथर्व भोसले याने इरावती कर्वे यांचे व्यंगचित्र रेखाटले. तिसऱ्या वर्षाच्या समीक्षा गुरव आणि भूमिका भोईर यांनी इरावती कर्वे आणि शांता गोखले यांचे व्यंगचित्र रेखाटले. कला, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा वापर करून तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या केतकी पाटील हिने मराठी साहित्य क्षेत्रातील विविध नामवंत लेखकांचे रेखाटलेल्या एकत्रित चित्रामुळे लक्षवेधी कलाकृतींमध्ये भर पडली. तसेच, चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी वर्णमाला, साहित्य, अभिजात या शब्दांच्या तयार केलेल्या कलाकृती आणि वासुदेवाची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरल्या.

आज ठाण्यात पर्वणी

रचना संसद कॉलेज ऑफ ॲप्लाइड आर्ट ॲण्ड क्राफ्ट या महाविद्यालयाच्या आयुषी गजबीर, हर्षिता भाटकर, वैदेही जगताप, अदिती मयेकर यांनीही विशेष मेहनत घेतली. सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले पसायदान, नृत्य आणि संगीताचा मिलाप साधणारी कलाकृती त्यांनी सादर केली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कलेसाठी घेतलेली ही मेहनत शुक्रवारी ठाण्यात होणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात लिट फेस्ट’मध्येही पाहण्याची संधी कलाप्रेमींना मिळणार आहे.

कला सादरीकरणात सहभागी विद्यार्थी

(वसंतदादा पाटील महाविद्यालय)

शुभदा सावंत

श्रावणी राणे

मधुरा धामणकर

रुद्र भांडारकर

कुणाल वंजारी

स्वयम पांचाळ

पर्णिका चौबळ

हेमाली मोहिते

चैत्राली भोसले

तिषा जैन

नेहा पारकर

मंजिरी पोफळी

हिमांशू काटकर

सम्यक जाधव

आदित्य बोराटे

यश मते

दामोदर सावंत

ध्रुव शिंदे

यश वळंजू

यश औदाम

शुभम स्वामी

दिलीप मते (यश मतेचे वडील)

स्पंदन ठाणेकर

केतकी पाटील

भार्गव पवार

प्रज्वल पवार

राज साळवे

रचना संसद

रवींद्र नाट्यमंदिरात रचना संसद कॉलेज ऑफ ॲप्लाइड आर्ट ॲण्ड क्राफ्ट या महाविद्यालयाच्या पार्थ जंगले या विद्यार्थ्याने लिटफेस्टमध्ये आलेल्या ३० हून अधिक कलाप्रेमींची त्यांना प्रत्यक्ष समोर बसवून रेखाचित्रे आणि व्यंगचित्रे काढली. त्याच्याकडे स्वतःचे चित्र काढण्यासाठी इच्छुक असलेल्यांची रीघ लागली होती.