‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या मंचावर गुंतवणूकदारांना सल्ला
निश्चित केलेल्या ध्येयाशी बांधील विचारपूर्वक केलेली गुंतवणूक ही दीर्घकाळात नेहमीच महागाईला मात देणारी आणि इच्छित संपत्ती निर्माणास मदत करणारी असते, असा कानमंत्र तज्ज्ञांनी गुरुवारी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या गुंतवणूकदार सल्ला मंचावर दिला. ‘रिजेन्सी ग्रुप’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी ‘बीएनपी परिबास म्युच्युअल फंड’ यांचे सहप्रायोजकत्व लाभले होते. पॉवर्ड बाय म्हणून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी’ आणि ‘नातू परांजपे’ यांचेही सहकार्य मिळाले. माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी तज्ज्ञांना गुंतवणुकीबाबतचे प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले.
‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’च्या तिसऱ्या वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी झाले. बीएनपी परिबास म्युच्युअल फंडाचे जोसेफ ओल्लूकरन, ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या प्रीती जुवेकर, ‘केसरी टूर्स’चे अध्यक्ष केसरीभाऊ पाटील, ‘नातू परांजपे’चे उत्तम नातू, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर व प्रकाशिका वैदेही ठकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधाच्या विवेचनात, गुंतवणूक विश्लेषक व स्तंभलेखक अजय वाळिंबे यांनी संपत्ती निर्मिती म्हणजे केवळ बचत नव्हे तर बचतीची मूल्यवृद्धी म्हणूनही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ठेवींवरील व्याजदर कमी होत असताना भांडवली बाजारासारखा अधिक वर्षिक परतावा देणारा मार्ग चोखाळण्यावर त्यांनी यावेळी भर दिला. चांगल्या समभागाची निवड कंपनीची आर्थिक पाश्र्वभूमी आदिंचा अभ्यास करून उत्तम भागभांडार (पोर्टफोलिओ) बांधण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. गंतवणुकीत सातत्य राखणे आणि आपले ध्येय निश्चित करणे हे कधीच ढळू देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थनियोजनाचे महत्त्व विशद करताना अर्थनियोजनकार भक्ती रसाळ म्हणाल्या की, विचार व उद्दीष्ट न राखता केलेली गुंतवणूक ही प्रसंगी जोखमीची ठरते आणि जोखमीचा सामना करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. वाढत्या महागाईवर मात करणारी गुंतवणूक असायला हवी. अर्थनियोजनाचे महत्त्व समजण्यास होणारा उशीर हा अनेकदा भविष्यात आव्हाने निर्माण करतो. अर्थनियोजन हे शास्त्रीय पद्घतीने सिद्घ झालेली गुंतवणुकीची प्रक्रिया असून गुंतवणुकीतील वेगवेगळे पर्याय अवलंबले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
सनदी लेखापाल चंद्रशेखर वझे यांनी संपत्ती हे साध्य नसून साधन आहे, असे स्पष्ट करत, कर टाळण्याचे मार्ग अवलंबण्यापेक्षा योग्य मार्गाने कर पूर्तता करून देशात संपती निर्माणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कर चुकवण्यासाठी विविध पर्याय शोधण्यापेक्षा गुंतवणूक किंवा खर्च यांचे नियोजन करून त्याला कर नियोजनाची जोड देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2016 रोजी प्रकाशित
ठोस उद्दिष्टांविना गुंतवणूक जोखमीचीच!
‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या मंचावर गुंतवणूकदारांना सल्ला
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-04-2016 at 02:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arth brahma investment analysis