तरुणाईमध्ये वैचारिक बैठक घालून देणारा ‘वक्ता दशसहस्रेषु’ हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून महाविद्यालयीन वर्तुळात लोकप्रिय होत आहे. विद्यार्थ्यांचे समाजभान, त्यांची भाषाजाण आणि मंचावर धिटाईत व्यक्त होण्याच्या गुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाला यंदाच्या सहाव्या वर्षांत उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या यंदाच्या सहाव्या पर्वाची महाअंतिम फेरी शनिवारी मुंबईत रंगणार असून राज्यातील आठ विभागांत स्पर्धा गाजवत विजेते ठरलेले विद्यार्थी आपले वक्तृत्व कसब पणाला लावणार आहेत.

मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर या आठ केंद्रावर गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या वक्तृत्त्वाच्या सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या भाषण कौशल्याचे दर्शन श्रोत्यांना झाले.  स्पर्धेतील विषयांतून  मंदिरात ‘राम उरलाय का’ असा प्रश्न मुंबईतील तरुण वक्त्यांनी प्रभावीपणे श्रोत्यांना ठणकावून विचारला. तर ठाण्यातील  स्पर्धकांनी  ‘महाविकासाची युती’ या विषयावर स्पर्धा गाजवली.

राम मंदिर आणि काश्मीरच्या मुद्दय़ावर तसेच स्पर्धेसाठी नेमून दिलेल्या विविध  विषयांवर राज्यातील  सर्वच विद्यार्थ्यांनी निर्भिडपणे मते मांडली.

राजकारण असो वा समाजकारण किंवा साहित्य असो वा सांस्कृतिक घडामोडी, भवतालच्या स्पंदनांना समाजमाध्यमांद्वारे प्रतिसाद देणाऱ्या आजच्या तरुणाईसाठी ‘लोकसत्ता’ने ‘वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून जाहीर अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध केले.

अनवट आणि कळीच्या विषयांवर व्यक्त होण्याची विद्यार्थी वक्त्यांची असोशी गेल्या पाच वर्षांप्रमाणेच या स्पर्धेच्या यंदाच्या सहाव्या पर्वातही कायम राहिली. आता शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीतून  राज्याचा वक्ता कोण ठरतो, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

प्रायोजक  : ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ ही स्पर्धा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर, अशा आठ केंद्रांवर  झाली. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ असून बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’, नॉलेज पार्टनर ‘चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’ हे आहेत.

मुंबई

मुंबई विभागीय फेरीत रुपारेल महाविद्यालयाची तन्वी गुंडये हिने प्रथम क्रमांक पटकावत मुंबई विभागातून महाअंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ प्राध्यापक आणि समीक्षक डॉ. विजय तापस आणि लेखक शेखर ढवळीकर यांनी केले.  सहा स्पर्धकांपैकी पाच विद्यार्थ्यांनी ‘मंदिरातील राम’ या विषयावर परखड विचार मांडले. सर्वच स्पर्धकांनी उत्तम प्रयत्न करत सुंदर अनुभव दिला, असे परीक्षक म्हणाले.

तन्वी गुंडये

ठाणे

जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रथमेश्वर उंबरे याने  ठाणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावत महाअंतिम फेरीत प्रवेश केला.  ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि प्राध्यापिका मीना गुर्जर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ज्वलंत विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केल्याचे मत यावेळी परीक्षकांनी मांडले ‘महाविकासाची युती’ या विषयावर प्रथमेश्वर याने प्रभावी सादरीकरण केले.

प्रथमेश उंबरे

पुणे

पुणे विभागातून श्रीगोंद्याच्या एन. एस. गुळवे महाविद्यालयाच्या प्रांजल कुलकर्णीने बाजी मारली.  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां रझिया पटेल आणि ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. आजच्या तरुण पिढीचे वाचन कमी होत आहे, इंटरनेटवरील माहिती भाषणात सादर केली जाते. असे होऊ नये. विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विचार करून, स्वत:च्या भाषेत मांडणी केली पाहिजे, अशी सूचना परीक्षकांनी स्पर्धकांना केली.

प्रांजल कुलकर्णी

नागपूर

नागपूर विभागातून  अमरावतीच्या प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेधवी मकरंद जांबकर विजयी झाली. डॉ. गणेश राऊत आणि नाटय़लेखक, कलावंत रंजना पाठक यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम फेरीमध्ये विद्यार्थी अत्यंत धिटाईने सादर झाल्याचे परीक्षक म्हणाले.

मेधवी मकरंद जांबकर

नाशिक

नाशिक विभागीय अंतिम फेरीत जे. आर. सपट महाविद्यालयाची श्रुती बोरस्ते विजेती ठरली. परीक्षक म्हणून नाटय़कलावंत धिरेश जोशी, रंगकर्मी माधुरी माटे यांनी काम पाहिले.  गंभीर विषयांवर स्पर्धकांनी आपले मत प्रामाणिकपणे मांडल्याचे मत परीक्षकांनी नोंदविले.

श्रुती बोरस्ते

औरंगाबाद

औरंगाबाद विभागीय  अंतिम फेरीत सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या आदित्य देशमुख याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. परीक्षक म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे  कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. दासू वैद्य यांनी काम पाहिले. या स्पर्धेमुळे तरुणाईत वैचारिक जडणघडण वाढावी, ही ‘लोकसत्ता’ची अपेक्षा पूर्ण होत असल्याचे मत परीक्षकांनी मांडले.

आदित्य देशमुख

रत्नागिरी 

स. ह. केळकर महाविद्यालयाच्या अनघा पंडित हिने प्रथम क्रमांक पटकावत रत्नागिरी विभागातून विजेतेपद पटकावले. परीक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रा. डॉ. सुभाष देव यांनी काम पाहिले. वक्तृत्त्वात भाषाशैली, सादरीकरण आणि मांडणी महत्त्वाची असते. आपली भाषा शरीर, मन आणि बुद्धीच्या वाढीनुसार विकसित व्हायला हवी, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले.

अनघा पंडित

कोल्हापूर

कोल्हापूर विभागीय अंतिम फेरीत शनिवारी पंढरपूरच्या उमा सीताराम गायकवाड हिने विजेतेपद पटकावले. कोर्टी येथील सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये ती शिकते.  लेखिका-मुलाखतकार नीलिमा बोरवणकर  तसेच  शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्वच स्पर्धकांच्या मांडणीत सखोलता असल्याचे मत परीक्षकांनी मांडले.

उमा सीताराम गायकवाड