भाषणकौशल्य, विषयाचा अभ्यास आणि मांडणी या तीनही निकषांवर चोख उतरलेल्या वक्त्यांची निवड राज्यभरातील आठही केंद्रांवरील प्राथमिक फेऱ्यांतून केल्यानंतर आता ‘लोकसत्ता’ने राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेच्या आयोजनातून सुरू केलेला महाराष्ट्रातील नवीन वक्त्यांचा शोध दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. मुंबईत रंगणाऱ्या महाअंतिम फेरीतील वक्त्यांच्या निवडीसाठी पुणे आणि रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी पार पडल्यावर आता मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी अनुक्रमे मुंबई आणि ठाणे या विभागांची अंतिम फेरी रंगणार आहे. प्राथमिक फेरीचे आव्हान यशस्वीरीत्या पार केलेल्या मुंबई केंद्रावरील सात, तर ठाणे केंद्रावरील नऊ स्पर्धकांमध्ये ही अंतिम लढत रंगणार आहे. ‘नाथे समूह’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफाइस’च्या सहकार्याने ‘लोकसत्ता’ने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आयुर्विमा महामंडळ, जनकल्याण बँक आणि तन्वी हर्बल यांचे सहकार्य मिळाले आहे.
समाजकारण, राजकारण, साहित्य, माध्यमे यांना स्पर्श करणाऱ्या, तरीही रोजच्या जगण्याशी संबंध असलेल्या, विचाराला चालना देणाऱ्या विषयाची मांडणी करण्याच्या आव्हानाला स्पर्धकांना सामोरे जायचे आहे. मुंबईत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आणि नाटककार प्रशांत दळवी यांचे स्पर्धकांसाठी व्याख्यान होणार आहे. ‘वक्तृत्वाचे प्रयोग’ या विषयावर ते बोलतील. नायगावकर हे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यंगावर मार्मिकपणे बोट ठेवणारे कवी म्हणून ओळखले जातात. तर दळवी यांची ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’, ‘सेलिब्रेशन’ अशी अनेक नाटके गाजली आहेत. ठाणे येथे अभ्यासू आणि रसाळ सूत्रसंचालक धनश्री लेले ‘सूत्रसंचालनातील गमतीजमती’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई :
*मुंबई विभागाची अंतिम फेरी सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, दादर येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून रंगणार आहे.
*या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रविवारपासून कार्यक्रमस्थळी सकाळी ८ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत उपलब्ध होणार आहेत.

ठाणे :
*ठाणे विभागाची अंतिम फेरी शेठ एनकेटीटी महाविद्यालय सभागृह, सीकेपी सभागृहा-जवळ, खारकर आळी, ठाणे (प.) येथे सायंकाळी पाच वाजल्यापासून रंगणार आहे.
*प्रवेशिका रविवारपासून लोकसत्ता ठाणे कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले मार्ग, नौपाडा, ठाणे (प.) येथे सकाळी १० ते साय. ५ या वेळेत उपलब्ध

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta elocution competition mumbai
First published on: 02-02-2015 at 02:29 IST