मुंबई : कलाकार घडतो तो रंगमंचावर. निराकारातून साकार रुप उमटावे तसे संवाद-अभिनयाचा मिलाफ साधणाऱ्या कलाविष्काराने रंगमंचीय अवकाश उजळून टाकणारा कलाकार पहिल्यांदा एकांकिकेच्या प्रयोगमंचावर स्वत:ला आजमावून पाहतो. राज्यभरातून अशा तरुण कलाकारांना एकांकिका स्पर्धेच्या मंचावर स्वत:ला आजमावून पाहण्याची संधी देत अभिनयासह विविध कलाक्षेत्राची कवाडे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पडघम वाजणार आहेत.

‘आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’ या मनोरंजनापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. महाविद्यालयीन सर्जनशील लेखक, दिग्दर्शक, कलाकार, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार, संगीतकार याच एकांकिका स्पर्धाच्या मंचावरून चित्रपट – मालिका अशा विविध माध्यमांत पुढे जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची संधी देणारी एकांकिका स्पर्धा म्हणून गेल्या सहा पर्वाच्या वाटचालीत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने नाटय़वर्तुळात लौकिक कमावला आहे. करोनाकाळात दोन वर्ष थांबलेली ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची घोडदौड पुन्हा एकदा त्याच वेगाने सुरू झाली आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकांकिका स्पर्धेचा मंच गाजवण्यासाठी सज्ज झालेली तरुणाई ज्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची आतुरतेने वाट पाहते आहे त्या स्पर्धेच्या प्रवेशिका लवकरच उपलब्ध होणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि कोल्हापूर अशा राज्यभरातील निवडक आठ शहरांमधून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडेल. या प्राथमिक फेरीत आपापल्या विभागात सर्वोत्तम ठरलेल्या एकांकिका विभागीय अंतिम फेरीला सामोऱ्या जातील. प्रत्येक केंद्रावरील विभागीय अंतिम फेरीत सर्वोत्तम ठरणारी एक एकांकिका अशा आठ एकांकिकांमध्ये अंतिम जेतेपदासाठी चुरस रंगेल. मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका’ कोण ठरणार?, याचे उत्तर रसिकांना मिळेल. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी संहिता लेखनापासून जीव ओतून तयारी करणारे तरुण नाटय़वेडे, आपला प्रयोग सर्वोत्तम व्हावा म्हणून रात्र-रात्र जागून केल्या जाणाऱ्या तालमी, पदरचे पैसे खर्चून एकांकिका उभी करण्यासाठीची धडपड असा माहौल पुन्हा एकदा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या निमित्ताने रंगणार आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षी या तरुण उमद्या कलाकारांना लेखन, अभिनय, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रात संधी देण्यासाठी आयरिस प्रॉडक्शनचे टॅलेंट पार्टनर म्हणून सहकार्य लाभणार आहे.

मुख्य प्रायोजक – सॉफ्ट कॉर्नर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहाय्य – अस्तित्व टॅलेंट पार्टनर – आयरिस प्रॉडक्शन