विजय केंकरे यांचा मोलाचा सल्ला; रुपारेल महाविद्यालयाची प्रिया तरडे महाअंतिम फेरीत
विचार पोहोचवण्यासाठी सादरीकरण आवश्यक असून विचारांकडे जाताना श्रोत्यांना गुंतवून ठेवण्याचे कसब वक्त्याच्या अंगी असले पाहिजे. वरच्या पट्टीत आरडाओरड केली म्हणजे विचार पोहोचले, असे होत नाही, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पध्रे’च्या मुंबई विभागीय अंतिम फेरीतील स्पर्धकांना दिला. या फेरीत रुपारेल महाविद्यालयाची प्रिया तरडे हिने प्रथम क्रमांक पटकावत महाअंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. विजय केंकरे यांच्यासह मीना वैशंपायन यांनी या स्पध्रेच्या परीक्षणाची जबाबदारी सांभाळली.
वीणा वर्ल्ड प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा पॉवर्ड बॉय डॉ. मिरजगावकर्स आयसीडी औरंगाबाद, बँक ऑफ महाराट्र, दी विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे, एमआयटी औरंगाबाद या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पध्रेच्या मुंबई विभागाची अंतिम फेरी पाल्र्याच्या पीटीबीएज् इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्टच्या केशवराव घैसास सभागृहात रविवारी पार पडली. ‘आपलं सगळंच ‘फ्लेक्सि’बल!’, ‘बुरखा-बिकिनी-बुíकनी’, ‘मूल्याचे मोल’, ‘आयसिसचा क्रायसिस’ आणि ‘देशप्रेम कोण ठरवणार?’ या विषयांवर अभ्यासपूर्ण मते मांडत स्पर्धकांनी स्पर्धा रंगतदार केली.
स्पध्रेची सुरुवात सोमय्या महाविद्यालयाच्या भाग्यश्री देशपांडे हिने ‘देशप्रेम कोण ठरवणार?’ या विषयावरील आपल्या भाषणाने केली. स्वदेशीचा मुद्दा, ऑनर कििलग आणि जागतिक पातळीवरून देशप्रेमाची व्याख्या या मुद्दय़ांना स्पर्श करत तिने आपला विषय मांडला. रुईया महाविद्यालयाच्या सेजल नातू हिने फ्लेक्सिबिलिटीमुळे समाजात घडणाऱ्या चांगल्या व वाईट घटनांवर तिरकस भाष्य केले. तिचे भाषण द्वितीय क्रमांक मिळवणारे ठरले त्यानंतर सुस्मिता भदाणे हिने धर्म आणि कर्मातील साचेबद्धपणा म्हणजेच देशभक्ती असून हल्ली राजकीय प्रभावामुळे देशभक्तीचा निराळा अर्थ काढला जात आहे, याकडे लक्ष वेधले. ‘बुरखा-बिकिनी-बुíकनी’ या विषयावर बोलताना नेहा प्रभु हिने पोशाख हा व्यक्तिमत्त्वाप्रमाणे असावा आणि तो स्त्रीवर लादला जाऊ नये, हा विचार मांडला. आयसिसचे अर्थकारण, त्यामागील धर्माचे राजकारण, आयसीसचे तरुणांमधील आकर्षण आदी मुद्दय़ांना स्पर्श करत नितेश रायकर याने आयसीसच्या धोक्याची समर्पक जाणीव आपल्या भाषणातून श्रोत्यांना करून दिली. त्याला तृतीय पारितोषिक देण्यात आले.
अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या प्रिया तरडे हिने ‘मूल्यांचे मोल’ हा विषय मांडताना अर्थकारण आणि तत्त्वज्ञान या दोन पातळ्यांवर मूल्य या विषयाची मांडणी केली. अर्थकारणाच्या दृष्टीने मूल्य कमी किंवा जास्त होऊ शकते, पण तत्त्वज्ञानाच्या पातळीवर मूल्ये शाश्वत असतात, असे सांगितले. या स्पध्रेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणाऱ्या प्रियांका मयेकर हिने देशप्रेमाच्या व्याख्येवर कोणाची मक्तेदारी असू नये, असे सांगत देशप्रेम चांगल्या गोष्टीतून ठरते आणि ते व्यक्तिसापेक्ष असते हा विचार मांडला. सर्वात शेवटी अक्षय खुडकर यानेही देशप्रेम कोण ठरवणार याचा ऊहापोह करताना संविधानाच्या चौकटींचा दाखला देत हे मुद्दे राजकारण्यांकडून तापवले जात असल्याचे मत मांडले.
विजेत्यांच्या प्रतिक्रिया
प्राथमिक फेरीच्या तुलनेत अंतिम फेरीत माझ्या भाषणात मला सुधारणा झाल्याचे जाणवले. त्यात प्राथमिक फेरीदरम्यान परीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा आहे. माझे शिक्षक, मित्र यांची खूप मदत झाली. महाअंतिम फेरीसाठी निवड झाल्याचा आनंद आहेच, पण मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करण्याचे दडपणही मोठे आहे.
– प्रिया तरडे, प्रथम क्रमांक
‘लोकसत्ता’च्या स्पध्रेमुळे उत्तम संधी मिळाली. तयारी करताना वेळ कमी असला, तरी कमी वेळात उत्तम तयारी करण्याची सवयही झाली. सर्वानी खूप मदत केल्यामुळेच अंतिम फेरी गाठू शकले. पुढल्या वर्षी जोमाने तयारी करून महाअंतिम फेरी गाठण्याचे ध्येय आहे.
– सेजल नातू, द्वितीय क्रमांक
विषय मांडण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला आणि त्याचा फायदा मला नक्कीच पुढेही होईल. परीक्षकांनी माझ्या भाषेवर काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्या अंगाने मेहेनत घेऊन पुढील स्पर्धामध्ये भाग घेणार आहे.
– नितेश रायकर, तृतीय क्रमांक
स्पध्रेचे दडपण होते. विषय मांडणे हे खरोखर कौशल्याचे काम होते. प्राथमिक फेरीत परीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा झाला. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे व्यक्त होण्याची संधी मिळाली.
– प्रियांका मयेकर, उत्तेजनार्थ