मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीतून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने लोअर परळ येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय व्यक्तीची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी बनावट मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून ही फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरून मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवहाराच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत.
सायबर फसणूकीसाठी मोबाइल अॅपचा वापर
५२ वर्षीय तक्रारदार लोअर परळ परिसरातील रहिवासी असून एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना २ मार्चला एक लिंक पाठण्यात आली होती. त्याद्वारे त्यांना आस्क एलिट ट्रेडर या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले होते. त्या ग्रुपमध्ये तक्रारदारासह आणखी १०२ सदस्य व ग्रुप अॅडमिन होते. त्या ग्रुपमध्ये शेअर्स संदर्भातील दैनंदिन माहिती दिली जात होती. ग्रुपमधील अॅडमिन सभासदांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत होता. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास किती फायदा होईल, कोणते आयपीओ फायदेशीर आहेत याबाबत माहिती मिळत असल्याने त्यांना शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत आकर्षण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी अॅडमिनशी चर्चा केली आणि गुंतवणुकीत रस असल्याचे दाखवले. त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्यानंतर ते दुसऱ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये सामील झाले. त्या ग्रुपमध्ये लिंकद्वारे तक्रारदाराला आस्क-आयएटॉप हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने सुरूवातीला या अॅपमध्ये १० हजार रुपये जमा केले. तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिलेल्या माहितीच्या आधारे त्या अॅपवरून शेअर्समध्ये पैसे गुंतवले. त्यात तक्रारदाराला ८७३ रुपयांचा नफा झाला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. मार्च ते मे २०२५ या कालावधीत तक्रारदाराने २९ विविध व्यवहारांद्वारे सुमारे सव्वा कोटी रुपये या अॅप्लिकेशनमध्ये जमा केले.
अॅपवर १६ कोटींचा नफा
या गुंतवणुकीवर तक्रारदाराला १६ कोटी ७५ लाख रुपयांचा नफा झाल्याचे अॅपवरुन दिसत होते. मात्र त्यांनी प्रयत्न केला असता त्यांच्या अॅपमधून रक्कम बँक खात्यात हस्तांतरीत होत नव्हती. त्यामुळे त्यांनी अॅडमिनकडे विचारणा केली असता त्यांना १० टक्के सेवा कर भरल्यानंतरच रक्कम काढता येईल, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने ३८ लाख रुपये या अॅपमध्ये भरले. त्यावर तक्रारदाराला रक्कम भरताना चूक झाल्याचे सांगून आणखी पाच लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. तेवढी रक्कम नसल्यामुळे तक्रारदाराला ती भरता आली नाही. अखेर त्यांनी वारंवार रकमेसाठी संपर्क साधला असता त्यांन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तक्रादाराने १९३० या सायबर हेल्पलाईनला दूरध्वनी केला. तक्रारदाराने घडलेला प्रकार सायबर पोलिसांना सांगून संबंधित अज्ञात आरोपीविरोधात तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर पोलिसांकडून तपास सुरु आहे.