मुंबई : पूर्व उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशाचे हाल झाले. चेंबूर-सांताक्रुज जोडरस्त्यावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. चेंबूरमधील शेल कॉलनी, पोस्टल कॉलनी, चेंबूर कॅम्प, भक्ती भवन, पी. एल. लोखंडे मार्ग, घाटकोपरमधील पंत नगर, गारोडिया नगर, घाटकोपर रेल्वे स्थानक पश्चिम, भांडूपमधील कोकण नगर, मानखुर्दमधील रेल्वे स्थानक परिसर, चुनाभट्टी येथील रेल्वे स्थानक परिसर, स्वदेशी मिल परिसर आणि कुर्ल्यातील नेहरू नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप बसविले आहेत. मात्र कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत होता.