मुंबई : आझाद मैदानावर गेले चार दिवस सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून आलेले मराठा कार्यकर्ते मंत्रालयात घुसण्याची शक्यता लक्षात घेता सोमवारी मंत्रालयासमोरचा मादाम कामा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे नेहमी गजबजलेला या रस्त्यावर शुकशुकाट होता. मंत्रालय परिसराला अक्षरक्ष: पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.

जरांगे यांच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयासमाेर आंदोलकांनी हुल्लडबाजी केली होती. त्यामुळे ४० मिनीटे या रस्त्यावरची वाहतुक ठप्प झाली होती. जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता, आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे मंत्रालय परिसरात मोठा बंदाबस्त तैनात होता.

मंत्रालय परिसरात मंत्र्यांचे १९ बंगले आहेत. शासनाची विविध कार्यालये असलेली प्रशासकीय इमारत आहे. या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपाची प्रदेश कार्यालये व आकाशवाणी आमदार निवासही आहे. हा परिसर अत्यंत वर्दळीचा व नेहमी गजबजलेला असतो. या परिसरात आंदोलकांनी घुसखोरी करु नये म्हणून बॅरीकेड लावून मादाम कामा रस्त्यावर येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. येथे दंगल नियंत्रण पथक तसेच शीघ्रदलाचे जवान येथे तैनात होते.

मरीन ड्राईव्हजवळील एअर इंडिया इमारत ते मंत्रालय समोरील हुतात्मा राजगुरु चौक हा मार्ग वाहने व पायी जाणारे नागरीक यांना बंद करण्यात ाआला होता. तसेच मंत्रायाच्या चारीही दरवाज्यांना आज वाढीव बंदाेबस्त ठेवला होता.