मुंबई : कोल्हापुरहून रविवारी रात्री निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी पहाटे मुंबईच्या पावसात अडकली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तासांनी ही गाडी मजल दरमजल करत सीएसएमटी स्थानकात पोहोचली. अंबरनाथ येथे अडकलेल्या या गाडीने २०१९ मधील पुराच्या आठवणी जाग्या केल्या.

मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका मुसळधार पाऊस सुरू होताच लाखो प्रवाशांना बसला आहे. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वेचा कारभार कोलमडला. रविवारी रात्री कोल्हापूरहून निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ६ वाजेपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत तब्बल चार तास  अंबरनाथ येथे एकाच ठिकाणी उभी राहिली. पहाटे उतरण्यासाठी म्हणून जाग्या झालेल्या प्रवाशांना गाडी पावसामुळे एकाच जागी थांबल्याची जाणीव झाली आणि २०१९ मधील आठवणी जाग्या होऊन अंगावर काटा उभा राहिला. त्यावेळी उल्हास नदीला आलेल्या पुरात ही गाडी अशीच पहाटे वांगणीजवळ अडकली होती.  त्यावेळी गाडीत जवळपास ७०० प्रवासी होते. त्यांची तब्बल बारा तासांनी सुटका झाली होती.

हेही वाचा >>>BMW नव्हे, आधी मर्सिडीजमध्ये बसला होता मिहीर शाह; वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा खुलासा, नंतर बदलली गाडी!

दरम्यान आजही अंबरनाथजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस पहाटे थांबवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मुंबई, ठाणे भागात जोरदार पाऊस पडल्याने, सोमवारी पहाटेपासून ठाणे ते सीएसएमटी रेल्वे मार्ग बंद केला. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या सर्व लोकल, अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या. परिणामी, प्रवाशांचा प्रवास रखडला.  कल्याण रेल्वे स्थानकात पहाटे ५.५७ वाजता पोहोचणारी कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस अंबरनाथ येथे थांबवून उपमार्गिकेवर उभी केली. अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर गाडी उभी केल्याने प्रवाशांना उतरणेही शक्य नव्हते.  सकाळी १० वाजेपर्यंत गाडी एकाच ठिकाणी थांबल्याने  प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. महिला, ज्येष्ठ प्रवासी, लहान मुले यांचे हाल झाले. गाडीत चहा, बिस्किटे, पाण्याच्या बटल्याही मिळाल्या नाहीत. सकाळी १० वाजल्यानंतर एक्स्प्रेस अंबरनाथवरून सुटली आणि १०.२४ वाजता कल्याणला पोहचली. त्यानंतर बहुतेक प्रवाशांनी कल्याण येथेच उतरून  इतर मार्गाने इच्छितस्थळ गाठण्याचा पर्याय स्वीकारला. साधारण १२:३० वाजता, नियोजित वेळेपेक्षा पाच तास उशिरा गाडी सीएसएमटी येथे पोहचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुसळधार पाऊस पडण्यास आताच सुरुवात झाली आहे. पुढे आणखीन जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने वेळीच यंत्रणा सुरळीत करण्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.