मुंबई : महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. राज्य सरकारने गतवर्षी दोन वर्षाच्या ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. मान्यता मिळाल्यानंतर पहिल्या वर्षी या पदविका अभ्याक्रमाला तब्बल ४२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून आरोग्य सेवेतील उपचारांसाठी ॲक्युपंक्चर अभ्यासक्रमाचा नवा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे. विज्ञान, वाणिज्य व कला अशा कोणत्याही शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांला या अभ्याक्रमासाठी अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र अक्युपंक्चर परिषदेकडून मान्यताप्राप्त दोन वर्षांच्या पूर्णवेळ पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नाही.

महाराष्ट्र अक्युपंक्चर परिषदेने मान्यता दिलेल्या अनुभवी प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षणाबरोबरच आंतरवासितादरम्यान प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभवही मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेचे प्रंबधक नारायण नवले यांनी दिली.

ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याची महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेकडे नोंदणी केली जाणार आहे. या नाेंदणीनंतर विद्यार्थ्यांना राज्यात अधिकृतरित्या अक्युपंक्चर व्यवसाय करण्यास कायद्याने मान्यता मिळणार आहे. तसेच त्यांना अतिशय कमी खर्चात स्वत:चे अक्युपंक्चर केंद्र सुरू करता येणार आहे. तसेच खाजगी रुग्णालये, कॉर्पोरेट रुग्णालयामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या अक्युपंक्चर विभाग आणि वैद्यकीय केंद्रे, वेलनेस सेंटर्ससारख्या ठिकाणी काम करण्याच्या संधी त्याचप्रमाणे उपचारासाठी मोजकी यंत्रसामुग्रीची आवश्यकता असल्याने घरोघरी जाऊन उपचार देता येऊ शकतात. ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायही सुरू करता येणार आहे. भारताबाहेर देखील अनेक देशांमध्ये ॲक्युपंक्चर व्यवसायींना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचेही नारायण नवले यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथम वर्षाची प्रथम सत्र परीक्षा यशस्वीरित्या पार पडली

ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रमाला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मान्यता मिळण्यास उशीर झाल्याने जानेवारी २०२५ पासून या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. या अभ्यासक्रमाची प्रथम सत्र परीक्षा नुकतीच १६ ते २० जून दरम्यान पार पडली. पहिल्या वर्षाला ४२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्याच्या व देशाच्या इतिहासात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. रुमी बेरामजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीतपणे पार पडल्याची माहिती नवले यांनी दिली.