मुंबई : राज्यात धर्मांतर विरोधात कायद्याच्या अभ्यासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालातील सूचनांचा विचार करून पुढील अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा मान्यतेसाठी विधी मंडळात सादर केला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.
भाजपच्या सदस्या उमा खापरे यांनी पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या अनाथ आश्रमात मुली व महिला यांचे धर्मांतरण केले जाते, अशी लक्षवेधी सूचना मांडली. या आश्रमातील असहाय्य मुली व महिला यांच्या सेवेच्या नावाखाली धर्मांतरण केले जाते. या संर्दभात ८ डिसेंबर २०२३ रोजी एका अनुसूचित जातीच्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केलेली आहे. असे खापरे यांनी सांगितले. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, डॉ. मनिषा कायंदे, सदाशिव खोत यांनी भाग घेतला.
केडगाव येथील अनाथ आश्रमामध्ये मुलींचे धर्मांतरण तसेच मुलींना मारहाण करणे, सार्वजनिक शौचालय साफ करायला लावणे, जातीवरून शिवीगाळ करणे, वाईट वागणूक देणे अशा फिर्यादीवरून ८ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. या संस्थेतील अनियमितता आणि बेकायदेशीर कृत्यासंदर्भात तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू असून एका महिन्यात चौकशी अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे भोयर यांनी सांगितले.