मुंबई : कोणाचा भाऊ, मुलगा, मुलगी, सून… नेतेमंडळींच्या नात्यागोत्यातील असे जवळपास ६० जण नव्या विधानसभेत निवडून आले आहेत. विशेष म्हणजे दोन भावांच्या जोड्या आणि एक बहीणभावाची जोडीही नव्या सभागृहात असेल. या वेळी सहा माजी मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकही निवडून आले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांचा घराणेशाहीवर भर होता. काँग्रेसमधील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने टीका करीत असले, तरी भाजपनेही अनेक नेतेमंडळींच्या मुलामुलींना उमेदवारी दिली होती. यावर सामान्य नागरिकही नाके मुरडत असले, तरी याच उमेदवारांना लोकांनी निवडून दिल्याचे निकालामुळे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित, अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया, नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र तर शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू संभाजी निलंगेकर हे निवडून आले आहेत. शरद पवार यांच्या घरातील अजित पवार आणि रोहित पवार हे दोघे भिन्न पक्षांतून विधानसभेत गेले आहेत. वसंतराव नाईक आणि सुधाकराव नाईक या माजी मुख्यमंत्र्यांच्या पुसद मतदारसंघातून इंद्रनील नाईक यांनी निवडून येत घराण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेले शेकापचे गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सांगोला मतदारसंघातून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा पराभव झाला असला, तरी त्यांची कन्या सना मलिक मात्र निवडून आल्या आहेत. वसईत हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करणाऱ्या भाजपच्या स्नेहा दुबे पंडित या श्रमजीवी संघटनेचे नेते व शिवसेनेचे माजी आमदार विवेक पंडित यांची कन्या आहे.

हेही वाचा >>> मुंबई : ठाकरेंची मक्तेदारी मोडीत, मुंबईवर भाजपची सरशी

याबरोबरच आशीष रणजित देशमुख, सत्यजित शिवाजीराव देशमुख, संग्राम अरुण जगताप, संदीप क्षीरसागर, डॉ. राहुल दौलतराव आहेर, शेखर गोविंदराव निकम, योगेश रामदास कदम, राहुल सुभाष कुल, प्रताप अरुण अडसड, अमोल चिमणराव पाटील, विजयसिंह शिवाजीराव पंडित, चेतन विठ्ठल तुपे, समीर दत्ता मेघे, राहुल प्रकाश आवाडे, मेघना रामप्रसाद बोर्डीकर (आता मेघना बोर्डीकर साकोरे), नमिता मुंदडा, सुलभा गणपत गायकवाड, सई प्रकाश डहाके, आकाश पांडुरंग फुंडकर, सुहास अनिल बाबर, अमल महादेव महाडिक, आशुतोष अशोक काळे, तुषार गोविंदराव राठोड, अॅड. राहुल उत्तमराव ढिकले, शिरीषकुमार सुरूपसिंह नाईक, विलास संदीपान भुमरे, विश्वजीत पतंगराव कदम, प्रशांत रामशेठ ठाकूर, अमोल हरिभाऊ जावळे, अमित सुभाष झणक, मोनिका राजीव राजाळे, सिद्धार्थ अनिल शिरोळे, रोहित आर. आर. पाटील, राणा जगतसिंह पदमसिंह पाटील, सुनील राऊत, करण संजय देवताळे हे अन्य राजकीय घराण्यांतील चेहरेही नव्या विधानसभेत दिसतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार-आमदार एकाच घरात

खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती, खासदार नितीन पाटील यांचे बंधू मकरंद पाटील, खासदार नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र, खासदार अशोक चव्हाण व त्यांची कन्या श्रीजया या एकाच घरातील खासदार-आमदारांच्या घरात जोड्याही या निवडणुकीच्या निमित्ताने तयार झाल्या आहेत.