आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सुकाणू समित्यांच्या ‘मॅरेथॉन’ बैठकीचे आयोजन नवी दिल्लीत केले असून महाराष्ट्रासह काही राज्यांची बैठक २३ ऑगस्ट रोजी १४ तास पार पडणार आहे. काही राज्यांमधील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती व पूर्वतयारीसाठी राज्यनिहाय तीन दिवस बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, व्ही सतीश, रवींद्र भुसारी हे नेते राज्य सुकाणू समितीचे सदस्य आहेत. मुख्यमंत्री वगळता इतर सदस्य या बैठकीसाठी जाणार असून, मुख्यमंत्री २७ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी ते ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना पक्षातील महत्त्वाच्या बैठकांमध्ये मात्र सहभागी करून घेतले जाणार आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक सकाळी आठ ते रात्री १० अशी सलग १४ तास होणार आहे. केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्यांची कामगिरी याबाबत चर्चा होईल. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार, वृक्षलागवड अशा काही योजना राबविण्यात आल्या, मध्य प्रदेशमध्ये शिधावाटप यंत्रणा चांगली आहे, काही राज्यांनी चांगले प्रकल्प उभारले आहेत, याविषयीच्या कल्पनांचे आदानप्रदान करून त्याचा भाजपला लाभ कसा होईल, याबाबत विचारविनिमय होऊ शकतो. महाराष्ट्र हे भाजपसाठी महत्त्वाचे राज्य आहे. भाजपला आगामी निवडणुकांमध्ये लाभ होण्यासाठी सरकार कशी वाटचाल करीत आहे, केंद्राकडून कोणत्या मदतीची अपेक्षा आहे, याविषयी ऊहापोह होईल, असे सूत्रांनी सांगितले.
- आता उत्तर प्रदेश, गुजरात व अन्य राज्यांमध्ये निवडणुका असून त्या भाजपच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
- या निवडणुकांसाठी रणनीती आखण्याबाबत राज्यांमधील सुकाणू समित्यांशी होणाऱ्या चर्चेत विचारमंथन होणार आहे. केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्य सरकार यांच्या बदनामीची पद्धतशीर मोहीम सुरू असल्याचे भाजपचे मत असून त्याला कसे तोंड द्यायचे, मंत्र्यांवरच्या आरोपांचे काय करायचे, यावरही चर्चा होणे अपेक्षित आहे.
- मुंबई महापालिकेचीही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची असल्याने त्याबाबतचे मुद्देही उपस्थित होऊ शकतात.