महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा पुन्हा एकदा मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८६.६० टक्के उत्तीर्ण झाले असून, यामध्ये मुलींची टक्केवारी तब्बल ९०.५० टक्के इतकी आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३.४६ टक्के इतके आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ४.६६ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्यावर्षी ९१.२६ टक्के इतका निकाल लागला होता.
शाखानिहाय निकालाची टक्केवारी
विज्ञान – ९३.१६
वाणिज्य – ८९.१०
कला – ७८.११
एमसीव्हीसी – ८१.६८
बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १३,२१,८२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३,१९,७५४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले आणि ११,४२,८८२ विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.
इथे पाहा बारावीचा निकाल
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
विभागनिहाय टक्केवारीमध्ये कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून, सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे.
पुणे – ८७.२६
मुंबई – ८६.०८
कोकण – ९३.२९
औरंगाबाद – ८७.८०
नागपूर – ८६.३५
कोल्हापूर – ८८.१०
लातूर – ८६.२८
अमरावती -८५.८१
नाशिक – ८३.९९
निकालामध्ये मुलींची आघाडी राज्यासाठी भूषणावह – मुख्यमंत्री
बारावी परीक्षेचा राज्याचा यंदाचा निकाल समाधानकारक असून, त्यात मुलींनी घेतलेली आघाडी पुरोगामी महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उत्तम रोजगार आणि व्यवसायाच्या संधी देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडून ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानात योगदान द्यावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने या शैक्षणिक वर्षापासून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने ही फेरपरीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य शासनाने शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे यंदाचा निकाल समाधानकारक लागला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यातील कारकीर्द घडविण्यासाठी उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

http://www.mahresult.nic.in, http://www.maharashtraeducation.com,www.result.mkcl.org,www.rediff.com/exams,maharashtra12.knowyourresult.com