मुंबई: कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड या संस्थेस कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील अडीच हेक्टर जमीन महिलांची सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली.
कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेडच्या अध्यक्षांनी महिला सहकारी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी जागेची मागणी केली होती. या संस्थेच्या स्थापनेतून महिला उद्योजक निर्माण होणार आहेत. तसेच रोजगार संधीही उपलब्ध होणार आहे. हा उद्देश लक्षात घेता जाहीर लिलावाशिवाय ही शासकीय जमीन रेडी रेकनरनुसार येणारी रक्कम आकारून भोगवटादार वर्ग- २ म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या धोरणानुसार काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयांतील १७ कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मंजुरी
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयातील तांत्रिक संवर्गातील गट-क श्रेणीतील विविध पदांवर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
संचालनालयाच्या अखत्यारीतील विविध संस्थांमध्ये तांत्रिक संवर्गात कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती, मृत्यू आणि अन्य काही कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांवर सेवायोजन कार्यालयाकडून किंवा स्थानिक स्तरावर संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात २९ दिवस तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली होती. अशा या १७ कर्मचाऱ्यांची सेवा अटी आणि शर्तींच्या अधीन राहून नियमित करण्यास मान्यता देण्यात आली.