राज्यातील २१२ नगरपालिका व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला. त्यानुसार राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये संपूर्ण आणि ७ जिल्ह्यांमध्ये अंशत: आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या काही जिल्हे वगळता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये निवडणुका नसलेल्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. त्याचे पडसाद मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. या निर्णयावर मंत्रिमंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याचा विकासावर परिणाम होईल त्याऐवजी संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्याऐवजी संबंधित नगरपालिकेच्या हद्दीतच आचारसंहिता असावी अशा मागणीचे पत्र सरकारच्या वतीने आयोगाला देण्यात येणार असल्याच समजते.

या आचारसंहितेमुळे मार्चपर्यंत निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहेत तसेच काही कामेही करता येणार नाहीत. त्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. २१२ नगर परिषदांमध्ये चार टप्प्यात मतदान होणार असून २७ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात २५ जिल्ह्यांमधील सर्वाधिक म्हणजेच १६५ नगर परिषदांमध्ये मतदान पार पडेल. दुस-या टप्प्याचं मतदान १४ डिसेंबरला पार पडणार असून यामध्ये लातूर आणि पुण्यातील १४ नगर परिषदांमध्ये मतदान पार पडेल. तिस-या टप्प्यात १८ डिसेंबर रोजी १२ नगर परिषदांमध्ये मतदान होईल. तर ८ जानेवारी रोजी चौथ्या टप्प्यात उर्वरित नगर परिषदांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. मतदानानंतर दुस-या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होईल असेही सहारिया यांनी स्पष्ट केले आहे.

२१२ नगर परिषदांमध्ये मुदत संपणा-या १९० नगर परिषदा, ४ नगर पंचायती, २ नवनिर्मित परिषदा आणि १६ नगरपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक असलेल्या नगर परिषदेच्या क्षेत्रात तसेच ज्या जिल्ह्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त नगर परिषदांमध्ये निवडणूक होत असल्यास त्या संपूर्ण जिल्ह्यात सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे असे सहारिया यांनी जाहीर केले. मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यावर आचारसंहिता संपुष्टात येईल असे ते म्हणालेत. २१२ नगर परिषदांमधील ४, ७५० जागांसाठी निवडणूक होणार असून यामध्ये २,४४५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ६०८, अनुसूचित जमातींसाठी १९८ तर मागासवर्ग प्रवर्गासाठी १,३१५ जागा आरक्षित आहेत.