मुंबई : राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना विधि ३ व विधि ५ वर्ष, बीपीएड, एमपीएड, एमएड व बीएड-एमएड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आला नाही. तसेच काही विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जात असलेल्या चुकांमुळे त्यांना प्रवेश घेण्यास समस्या निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) संस्थात्मक वाढीव फेरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही फेरी ३ ते ५ ऑक्टोंबरदरम्यान राबविण्यात येणार आहे.
राज्याच्या विविध भागात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना संस्थात्मक फेरीदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी १२ वी, पदवी, पदव्युत्तर पदवी यासारख्या पात्रता परीक्षांचे गुण चुकीचे भरल्याचे आढळून आले. विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले असून, त्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) सचिव ॲड. वैभव थोरात यांनी, तसेच विद्यार्थी आणि महाविद्यालयानी सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे केली होती. याचा विचार करून सीईटी कक्षाने विधि ५ वर्षे, विधि ३ वर्ष अभ्यासक्रमासह बीपीएड, एमपीएड, एमएड व बीएड-एमएड या अभ्यासक्रमासाठी संस्थात्मक स्तरावरील फेरीसाठी प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्यासाठी आणि प्रवेश घेण्यासाठीची वाढीव फेरी ३ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फेरी ५ ऑक्टोबरपर्यंत असेल. या वाढीव फेरीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची शेवटची संधी मिळणार आहे. तसेच या वाढीव संस्थात्मक फेरीमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा विकल्प देण्याची संधीही सीईटी कक्षानी दिली आहे.
सीईटी कक्षाचे मुदतवाढ दिलेल्या अभ्यासक्रमापैकी विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाला आतापर्यंत २१ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, १ हजार ११६ जागा रिक्त राहिल्या आहेत. तसेच विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाला ९ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ३ हजार ५६३ जागा रिक्त राहिल्या आहेत. तसेच बीपीएडला ३ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून २ हजार ६६२ जागा रिक्त राहिल्या आहेत. एमपीएडच्या १३४ जागा रिक्त असून, ८७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एमएडसाठी १ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, १ हजार ३९९ जागा रिक्त आहेत. बीएड-एमएडच्या ३९ जागा रिक्त असून फक्त १६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
राज्यात झालेली अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे व इतर तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थी विधि, बीपीएड,एमपीएड, एमएड व बीएड-एमएड या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकले नाहीत. या सर्व विद्यार्थ्यांना ही एक संधी देऊ केली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. – दिलीप सरदेसाई, आयुक्त, सीईटी कक्ष