राज्यातील आघाडी सरकारने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जाणीवपूर्वक घेतलेल्या ‘सुकन्या’, ‘मनोधैर्य’, ‘राजीवगांधी जीवनदायी’ या योजनांवर काँग्रेसची छाप कशी राहील, त्यादृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रयत्न सुरू आहेत. अन्न सुरक्षा ही केंद्र सरकारची योजना आहे. परंतु राज्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची योजना म्हणून तिचा प्रचार करण्यात येणार आहे. या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी खास बैठक बोलाविली आहे. या संदर्भात ते राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २००९ च्या निवडणुकांमध्ये दिलेल्या काही आश्वासनांची आता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पूर्तता करण्यात येत आहे. गरीब व मध्यमवर्गीयांसाठी लाभदायक ठरणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यभर कशी राबविता येईल, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. पुढील महिन्यात या योजनेचा शुभारंभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींना सन्मानाने वाढविणे आणि वागविणे यासाठी ‘सुकन्या’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वच समाजातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबात मुलगी जन्माला येताच तिच्या नावावर २१ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवण्यात येणार आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला एक लाख रुपये मिळणार आहेत. गरीब मतदारांना आकर्षित करणाऱ्या या योजनेचा निवडणुकीत लाभ उठविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. त्यानंतर बलात्कार पीडितेला तसेच अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याच्या ‘मनोधैर्य’ योजनेलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी या चार योजनांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली आहे. निर्णय आघाडी सरकारचे असले तरी निवडणूक प्रचारात त्यावर काँग्रेसची छाप कशी राहील, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खास पुढाकार घेतला असल्याचे बोलले जात आहे.