निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने समाजातील विविध घटकांना खुश करण्यासाठी लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत फायदेशीर ठरतील, असे निर्णय घेण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खास लक्ष घातल्याचे सांगितले जाते.
राज्यातील १५ जिल्ह्यांतील नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील अल्पसंख्याकबहुल वस्त्यांमधील विकास कामांसाठी बुधवारी ३ कोटी ९ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने ‘अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ६९ नगरपालिका व काही महानगरपालिकांना अनुदान देण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतील ३१ नगरपालिका व एका महापालिकेला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात रत्नागिरी, अहमदनगर, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.
या जिल्ह्यांतील नगरपालिका व महापालिकांमधील अल्पसंख्याक बहुल वस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधणे, विजेचे खांब बसविणे, नाले बांधणे, स्मशानभूमी, कबरस्थान, पथदिवे, संरक्षण भिंती बांधणे इत्यादी विकास कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. अल्पसंख्याक बहुल वस्त्यांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी तसेच लहान-मोठी विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी खास मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याचे सांगण्यात येते.