मुंबई : पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व वास्तुकला परिषद या शिखर परिषदांद्वारे मान्यता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची मान्यता प्रक्रिया सुरू असून, संबंधित अभ्यासक्रम राबविणार्या तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी शिखर परिषदांची मान्यता घेऊन १ जुलैपर्यंत माहिती अद्ययावत करावी, असे स्पष्ट निर्देश तंत्रशिक्षण संचालनलायामार्फत देण्यात आले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्याकडून ३० जून २०२५ पर्यंत म्हणजेच प्रथम फेरीच्या सुरुवातीपर्यंत मान्यताप्राप्त संस्थांमधील अभियांत्रिकी पदविका व वास्तुकला पदविका अभ्यासक्रमांना संलग्नता प्राप्त करून त्यांचा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे, अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र ३० जून २०२५ नंतर संलग्नता मिळविणार्या संस्थांचा समावेश प्रवेश प्रकियेच्या वेळापत्रकानुसार उपलब्ध असलेल्या फेरीत करण्यास व त्यानंतरही संलग्नता मिळविणार्या संस्थांना संस्थास्तरावर प्रवेश करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनलायाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.

पदविका अभ्यासक्रमांसाठी संबंधित शिखर परिषदेची मान्यता, शासन मान्यता, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई संलग्नता, समकक्षता प्रदान केल्याची माहिती अद्ययावत करून १ जुलै २०२५ रोजी दुपारी ५ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर सादर करणे गरजेचे आहे. कोणत्याही संस्थेची माहिती अद्ययावत करणे प्रलंबित राहिल्यास व त्यामुळे संस्थेचा समावेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेची राहील. तसेच, मंजूर प्रवेश क्षमतेची माहिती प्रवेश प्रक्रियेदरम्यान जागा वाटपात दर्शविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित माहितीत कोणतीही चूक झाल्यास व पर्यायाने प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचण उद््भवल्यास त्यास संबंधित संस्थेचे प्राचार्य जबाबदार राहतील. त्यामुळे योग्य व अचूक माहिती भरावी, असे निर्देश डॉ. विनोद मोहितकर यांनी तंत्रशिक्षण पदविका महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागीय कार्यालयांनाही सूचना

तंत्रशिक्षण पदविका महाविद्यालयांना माहिती अद्ययावत करण्यासंदर्भात निर्देश दिलेले परिपत्रक महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही विभागीय कार्यालयातील सहसंचालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांनी सादर केलेली माहिती पडताळणी करून व अचूक माहित्ती प्रमाणित करून संकेतस्थळावर २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अद्ययावत करावी व त्याबाबतचा अंतिम अहवाल संचालनालयास सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.