सातारा, परळी, साकोलीत पराभव, पुण्यातही झटका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचाराच्या पहिल्याच दिवशी सभा घेऊन प्रतिष्ठेचा प्रश्न केलेल्या साकोली विधानसभेसह सातारा, परळीत भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला असून पुण्यातही आठपैकी दोन जागांवर पराभव झाल्याने फटका बसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात नऊ सभा घेतल्या. पहिल्याच दिवशी जळगावसह साकोलीची निवड मोदी यांनी केली होती. भाजपचे खासदार असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट मोदींना आव्हान देत नाना पटोले बाहेर पडले. ते साकोली विधानसभा मतदारसंघातून रिंगणात होते. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती व पर्यावरण राज्यमंत्री परिणय फुके यांचे आव्हान होते. महाराष्ट्रातील प्रचाराच्या पहिल्याच दिवशी साकोलीत सभा ठेवत मोदींनी एकप्रकारे राजकीय संदेशच दिला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताकद लावूनही नाना पटोले यांनी फुके यांचा पराभव केला. परळी विधानसभा मतदारसंघातही मोदी यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठिशी आहोत असा संदेश देण्यासाठी सभा घेतली. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यालाही हजेरी लावली. तरीही पंकजा मुंडे यांचा तब्बल ३० हजार मतांनी पराभव झाला.

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक व त्या भागातील विधानसभा मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान मोदी यांची सभा साताऱ्यात ठेवण्यात आली. मात्र, खुद्द

छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. शिवाय विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या अतुल भोसले, मदन भोसले या उमेदवारांना यश मिळाले नाही. शिवेंद्र राजे भोसले मात्र विजयी झाले. पुण्यातही आठपैकी हडपसर आणि वडगाव शेरी या मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला.