देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्रिपदावर पुन्हा मीच येईन याविषयी माझ्या मनात शंका नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी आपणच पुन्हा राज्याचे नेतृत्व करणार याबाबत विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सत्तावाटपाबाबत जे ठरले आहे त्यानुसारच पुढे जाऊ. काय ठरले आहे ते योग्यवेळी कळेल, असे सांगत फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेसह वाटून घेणार की नाही यावर सूचक मौन बाळगले. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये रस्सीखेच रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात विजयोत्सवात भाग घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना सत्तावाटप ५०-५० टक्के ठरल्याचे नमूद करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत अपेक्षा व्यक्त केल्याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता, उद्धव ठाकरे यांच्यासह ठरल्यानुसारच पुढे जाणार आहोत. मात्र त्यांच्यासोबत काय ठरले ते आता नाही तर योग्यवेळी समजेल, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.
राज्याच्या जनेतेने महायुतीला बहुमताचा स्पष्ट कौल देत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आणल्याबद्दल मतदारांचा आभारी आहे. २०१४ च्या तुलनेत या वेळी भाजपच्या कमी जागा निवडून आल्याचे दिसत असले तरी २०१४ मध्ये आम्ही २६० जागांवर लढून १२२ ठिकाणी विजय मिळवला होता. आता मित्र पक्षांसह १६४ जागा लढवून १०० च्या पुढे मजल मारली आहे. त्यामुळे यशाची टक्केवारी यंदा अधिक आहे. त्याचबरोबर २६० जागा लढवून २८ टक्के मते मिळवली होती. आता १६४ जागा लढवून २६.५ टक्के मते मिळवली हेही प्रमाण पूर्वीपेक्षा चांगले आहे, असा युक्तिवाद फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्षाला मागच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या असल्या तरी खूप काही जागा मिळालेल्या नाहीत. पण तरीही लोकशाहीत विरोधी पक्ष सक्षम असणे चांगलेच असते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. सत्ताधाऱ्यांना उन्माद नडला या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, पवार म्हणाले होते की सत्तांतर होणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी बहुमत मिळवणार. पण तसे काहीच झाले नाही, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. राष्ट्रवादीच्या काही जागा वाढल्या पण त्यामुळे विरोधकांचा फार फायदा झाला असे नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
१५ अपक्ष संपर्कात : बंडखोरीकरून निवडून आलेल्यांसह सुमारे १५ अपक्षांनी आजच माझ्याशी संपर्क साधला असून आम्ही महायुतीसोबत आहोत, असे सांगितले. त्यामुळे सरकारचे संख्याबळ आणखी वाढेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
पंकजा आणि उदयनराजेंच्या पराभवाचा धक्का
पुन्हा युतीचे सरकार आले असले तरी साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील छत्रपती उदयनराजे आणि परळी विधानसभा मतदारसंघातील पंकजा मुंडे यांचा पराभव हे दोन निकाल भाजपसाठी धक्कादायक आहेत. इतरही काही मंत्री पराभूत झाले असून त्याबाबत विचार करू. मोठय़ा प्रमाणात झालेल्या बंडखोरीचा आम्हाला काही फटका बसला आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
