मुंबई : ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत देशभरात शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्याचे काम सुरू आहे. राज्यात रविवार अखेर ९५ लाख ८५ हजार ५०१ शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक मिळाला आहे. शेतकऱ्यांना ओखळ क्रमांक देण्यात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असल्यामुळे शेतकऱ्यांना ओळख क्रमांक काढण्याला प्राधान्य दिले जात आहे. राज्यात १ कोटी ७१ लाख १० हजार ६९७ शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ कोटी ८ लाख ४ हजार ५४२ शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ कोटी ८ लाख २ हजार ४१८ शेतकरी खातेदारांनी शेतकरी ओळख क्रमांकासाठी अर्ज केले आहेत.
त्यापैकी ९५ लाख ८५ हजार ५०१ शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्यात आला आहे. राज्यात १.७१ कोटी शेतकरी खातेदार असले तरीही नोकरदार शेतकरी, घरे, शेतघरे बांधण्यासाठी शेतजमिनी खरेदी केलेल्या शेतकरी खातेदारांनी शेतकरी ओळख क्रमांकासाठी अर्ज केलेले नाहीत. तसेच सरकारी योजनांचा लाभ न घेणाऱ्या शेतकऱ्यांनीही शेतकरी ओळख क्रमांकासाठी अर्ज केलेला नाही.
त्यामुळे राज्यात सरासरी १.७१ कोटींपेकी साधारण १.३० कोटी शेतकरी ओळख क्रमांकांसाठी अर्ज करतील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.