मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन ऑक्टोबरला सुरू झालेल्या ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा आता लोकसहभागातून राज्यभर वेग घेणार आहे, अशी घोषणा नुकतीच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
या अभियानासाठी राज्यस्तरीय, जिल्हावार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव राज्यस्तरीय समितीचे प्रमुख असतील. या अभियानाचे यश लोकसहभागात असून, प्रत्येक समितीने लोकसहभाग जास्तीत जास्त राहील, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा >>> “इतका घाणेरडा महाराष्ट्र आजपर्यंत मी पाहिलेला नाही,” राज ठाकरे संतापले; म्हणाले “आमच्या माणसांनी…”
प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. त्यावर उपाय म्हणून नदी जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्या दूर करणे हे या अभियानातून अभिप्रेत असून लोकसहभागातून हे अभियान निश्चित यशस्वी होईल व प्रत्येक समिती त्या दृष्टीने काम करेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद होत आहेत का? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “मी तर…”
नदी संवाद यात्रे दरम्यान २ ऑक्टोबर ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये राज्यभरातील किमान ७५ नद्यांपर्यंत यात्रा पोहोचणार आहे. अभ्यासाचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून १ डिसेंबर २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत अभ्यासाचा दुसरा टप्पा पूर्ण होईल. या अभ्यासावर आधारित लोक शिक्षणाचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आखण्यात येईल व १ ते २० जानेवारी २०२३ या काळात अहवालास अंतिम स्वरूप दिले जाईल.