मुंबई : धारावी पुनर्विकासासाठीची बांधकाम निविदा अखेर शनिवारी जारी करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर मागविण्यात आलेल्या या निविदेनुसार ३१ ऑक्टोबपर्यंत इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहेत. त्यानुसार येत्या तीन ते चार महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कामाला सुरुवात करत पुढील सात वर्षांत प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

धारावी पुनर्विकासासाठी चौथ्यांदा निविदा मागविण्यास मंजुरी देत सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय ही जारी केला.  पुनर्विकास प्रकल्पाने निविदा काढण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करत शुक्रवारी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविली. त्यापाठोपाठ शनिवारी बांधकामासाठी निविदा जारी केली आहे. आता  सल्लागाराची नियुक्ती करत पुढे तीन ते चार महिन्यांत बांधकाम निविदा अंतिम करण्याचे  नियोजन आहेत. जागतिक स्तरावर या निविदा मागविण्यात आल्या आहे.  अधिकची बोली लावणारी कंपनी बाजी मारेल. १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहे. तर ११ ऑक्टोबरला निविदापूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आधी तीनदा निविदा काढत विविध कारणांनी निविदा रद्द करण्यात आल्या. तेव्हा  चौथ्यांदा निविदेला कसा प्रतिसाद मिळतो व या वेळी तरी निविदा प्रक्रिया अंतिम होते का आणि  रखडलेला प्रकल्प मार्गी लागतो का हे पाहणे आता महत्त्वाचे असेल.