मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून आगामी शैक्षणिक वर्षामध्ये दोनदा सीईटी घेण्याचा निर्णयाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली. त्यानुसार पीसीएम, पीसीबी व एमबीए या परीक्षा वर्षांतून दोन वेळा होणार आहेत. पहिली प्रवेश परीक्षा मार्च २०२५ मध्ये तर दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२५ मध्ये होणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर जेईई दोनदा होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी मिळते. तशाच दोन संधी महाराष्ट्रातील मुलांनाही या दोन प्रवेश परीक्षेमधून मिळणार आहेत. विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असेल. विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास त्याला दोन्हीपैकी ज्यात जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील.

येत्या वर्षात पीसीएम, पीसीबी व एमबीए या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी व व्यवस्थापन या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोनवेळा सीईटी देण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयानुसार पहिली प्रवेश परीक्षा एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात येईल. दुसरी प्रवेश परीक्षा मे २०२५ महिन्यात होणार आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी कक्षामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

वर्षातून दोनदा सीईटी घेण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पडताळणी सुरू होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जेईई परीक्षा आणि केंद्रांची उपलब्धता अशा बाबींमुळे परीक्षा घेण्यात येणाऱ्या अडचणींची मागील काही दिवसांपासून चाचपणी करण्याचे काम सुरू होते.

परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

  • पीसीएम (इंजिनीअरिंग सीईटी) – सुमारे ५.५ लाख विद्यार्थी
  • पीसीबी (औषधनिर्माणशास्त्र, कृषी) – सुमारे ४.८ लाख विद्यार्थी
  • एमबीए – सुमारे १.५ लाख विद्यार्थी