मुंबई : विविध मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या राज्यातील सरकारी रुग्णालयातील ३० हजार परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे.
यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, संपामुळे रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना रुग्णसेवेसाठी तैनात करण्यात आले आहे.
राज्य सरकारने गतवर्षी १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. या रुग्णालयांमध्ये परिचारिकांची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर सध्या सुरू असलेल्या रुग्णालयांमधील परिचारिकांना तेथे पाठविण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयातील ५० टक्के पदे आधीच रिक्त असताना या निर्णयामुळे परिचारिकांवर कामाचा ताण पडत आहे. एका वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी साधारणपणे ५०० परिचारिकांची आवश्यकता असते.
वैद्यकीय महाविद्यालयात आधीच परिचारिकांची मोठी कमतरता आहे. त्याशिवाय, नवीन वैद्यकीय महाविद्यालयात नवीन नियुक्त्या न झाल्यामुळे, विद्यमान परिचारिकांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. या रिक्त पदांसाठी सरकार कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची नियुक्ती करीत आहे, ज्याचा संघटनेने निषेध केला आहे.
सातव्या वेतन आयोगात स्टाफ नर्स, वॉर्ड इन्चार्ज आणि नर्सिंग शिक्षकांना दुर्लक्षित करण्यात आले आहे. फक्त बालरोग, मानसोपचार इत्यादी विभागांच्या विशेष परिचारिकांनाच सातवा वेतन आयोग दिला जात आहे. सर्व परिचारिकांसाठी सरकारने असाच निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.