राज्यातील पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे; परंतु पत्रकारितेच्या नावाने चालणाऱ्या वाईट प्रकारांना संरक्षण देणे योग्य ठरणार नाही, अशी परखड भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
मंत्रालयातील नव्या पत्रकार कक्षाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. त्यानंतर झालेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठी निवृत्तिवेतन, आरोग्यविषयक सुविधा व घरांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. माहिती व जनसंपर्क संचालनालय आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित केलेल्या समारंभाला मुख्यमंत्र्यांबरोबरच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकत्र आले होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तयारी पण…
पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. सोमवारी त्यासाठी राज्यभर पत्रकारांनी आंदोलने केली.  पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे, परंतु पत्रकारितेच्या नावाखाली जे चुकीचे घडते, त्याला मात्र संरक्षण असू नये, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.